पोलादपूरमधील शाळेला फर्निचर, शैक्षणिक साहित्याची भेट
खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. या संस्थेची विविध शाळा-महाविद्यालये यशाची नवनवी शिखरे गाठत आहेत. सोबतच ही विद्यासंकुले सामाजिक बांधिलकी जपत असून, संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिककडून रयत शिक्षण संस्थेच्या पोलादपूर तालुक्यातील पैठण येथील न्यू इंग्लिश स्कूलला फर्निचर, संगणक, प्रिंटर व लॅपटॉप भेट देण्यात आला आहे. पैठण येथील न्यू इंग्लिश स्कूल हे अतिदुर्गम व डोंगराळ भागात आहे. या विद्यालयात अत्याधुनिक शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमधून एक लॅपटॉप, एक संगणक, एक प्रिंटर, सहा कुशन चेअर, 12 उत्तम प्रतीच्या प्लास्टिक चेअर, दोन वर्गटेबल असे साहित्य प्रदान करण्यात आले. यापूर्वीही पैठणच्या शाळेस लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वेळोवेळी भरघोस मदत केली आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी यांनी पैठण शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. उत्तेकर यांच्याकडे साहित्य सुपूर्द केले. या वेळी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब कारंडे, मुख्याध्यापक आर. पी. ठाकूर (मार्केट यार्ड, पनवेल शाळा) व खारघर स्कूलच्या को-ऑर्डीनेटर इफात काटे आदी उपस्थित होते.