खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथील सेक्टर 19 प्लॉट क्र. 43 येथे सिडकोने उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात शौचालयदेखील होते, परंतु सिडकोच्या व कंत्राटदारामधील तांत्रिक अडचणीमुळे हे शौचालय बंद होते. ही बाब नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठपुरावा केला व त्याची दखल घेत बंद शौचालय सुरू करण्यात आले.
उद्यानात सकाळ-संध्याकाळ चालायला येणार्या नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब नगरसेविका नेत्रा पाटील यांनी वेळोवेळी सिडको प्रशासनाच्या निदर्शनासदेखील आणून दिली होती. सध्या सिडकोकडून उद्याने व खेळाची मैदाने यांची पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरण प्रकिया सुरू आहे. यात प्लॉट क्र. 43, सेक्टर 19 येथील नक्षत्र उद्यानाचेदेखील हस्तांतरण झाले. शौचालय बंद अवस्थेत आहे हे नगरसेविका नेत्रा पाटील यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त श्याम पोशेट्टी (आरोग्य विभाग) यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत पालिकेचे सॅनिटरी इन्स्पेक्टर जितेंद्र मढवी यांनी कर्मचार्यांना सांगून साफसफाई करून ते सर्व नागरिकांसाठी खुले करून दिले. यामुळे नागरिकांनी कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा पाटील यांचे आभार मानले आहेत.