नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. धोनी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाची सुरुवात येत्या 29 मार्चपासून होत आहे. यासाठी धोनी लवकर सराव सुरू करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आणि चाहते त्यांच्या थाला (लिडल)ची वाट पाहत आहेत.
धोनीने केल्या वर्षी 10 जुलै रोजी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. मॅनचेस्टरमध्ये वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये धोनी खेळला होता. या सामन्यात धोनी धावाबाद झाला आणि भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिलीमीटरच्या एका चुकीमुळे धोनी मैदान, सराव सत्र आणि क्रिकेटपासून दूर झाला.
गेल्या काही महिन्यात धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा झाली. अनेकांनी त्याच्या क्रिकेट न खेळण्याबद्दल शंका उपस्थित केली होती. धोनी भविष्यातील योजनेसंदर्भात स्वत: तो किंवा बीसीसीआयकडूनदेखील काहीच बोलले गेले नव्हते. गेल्या सात महिन्यांत धोनी फक्त एकदाच नेटमध्ये सराव करताना दिसला. रांचीमध्ये झारखंड रणजी संघासोबत त्याने सराव केला होता. सरावाच्या वेळी धोनीने त्याचा जुना फॉर्म दाखवला होता.
आयपीएलमध्ये धोनी खेळणार हे आधीच निश्चित झाले होते. आता या स्पर्धेतील कामगिरीवर त्याचे भारतीय संघातील स्थान ठरणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका कार्यक्रमात निवृत्तीसंदर्भातील प्रश्नावर धोनीने जानेवारीपर्यंत मला काही विचारू नका, असे म्हटले होते.
आयपीएलसाठी तयारी
धोनी 29 फेब्रुवारी रोजी चेन्नईत दाखल होणार आहे. 1 मार्चपासून तो संघासोबत सरावाला सुरुवात करेल. सरावासाठी 24 पैकी 15 ते 16 खेळाडू असतील. अन्य खेळाडू मार्चच्या दुसर्या आठवड्यात येतील. आयपीएलमधील पहिला सामना 29 मार्च रोजी चेन्नई विरुद्ध मुंबई यांच्यात होणार आहे. त्याआधी चेन्नईच्या खेळाडूंसोबत तीन ते चार सराव सामने होणार आहेत. हे सामने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळले जाणार असून, ते पाहण्यासाठी चाहत्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …