Breaking News

उपनगरीय लोकलसेवा सुलभ होण्याची आवश्यकता

मुंबईचे उपनगर म्हणून ज्याप्रमाणे वसई आणि विरारचा विकास झाला, त्याप्रमाणे कर्जत भागाचा विकास झाला नाही. त्यामुळे विरार फास्टला जेवढे महत्त्व पश्चिम रेल्वेमार्गावर आहे, तेवढे मध्य रेल्वेवर आणि त्या मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कर्जत दिशेकडील रेल्वेस्थानकांत नाही. परिणामी कर्जत परिसराचा विकास मुंबईचे उपनगर असूनदेखील झाला नाही. शैक्षणिक हब म्हणून विकसित होत असलेल्या आणि मुंबई व पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कर्जतला पोहचण्यास मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून यायला तासाला आणि दीड तासाच्या फरकाने लोकलगाड्या आहेत. ही विषमता विरार फास्टसारखी बदलणार आहे काय?

मुंबई या महानगरातील माणसे मागील काही वर्षांत सातत्याने मुंबईबाहेर पडत आहेत. मुंबईच्या नगरात राहणारे उपनगरात गेले होते. ते मागील 20 वर्षांत ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पोहचले आहेत. त्यामुळे मुंबईमधील मराठी टक्का कमी झाला आहे हे स्पष्ट होते, पण मुंबईतील माणसे ही पनवेलपर्यंत नवी मुंबईत आली, तशी मोठ्या संख्येने वसई, नालासोपारा आणि विरार भागात विसावली. त्या दोन्ही भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे त्या तांड्याला मुंबईत आणण्यासाठी आणि पुन्हा मुंबईतून घरी सोडण्यासाठी हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील उपनगरीय गाड्यांची संख्या वाढली. तसे कर्जत या मुंबई-पुणे मार्गावरील आणि मुख्य म्हणजे मेन लाइनवरील रेल्वेस्थानकात पोहचण्यास मध्य रेल्वेकडून उपनगरीय लोकलची संख्या काही प्रमाणात वाढली, पण पाहिजे तेवढ्या गाड्या या मार्गावर वाढल्या नाहीत आणि त्यामुळे जाण्यासाठी गाड्या अधिक प्रमाणात नसल्याने लोकांचा तांडा कर्जतला यायच्या ऐवजी तो विरार फास्ट पकडून जाणे पसंत करू लागला.

उपनगरीय लोकलची सुविधा अधिक नसल्याने कर्जतचा पाहिजे तेवढा विकास होऊ शकला नाही हे सत्य मानायलाच हवे. रात्री पावणेअकरा वाजले की कर्जत स्थानकातून मुंबईला जाण्यासाठी गाडी नाही. असे होणार असेल तर कर्जत, नेरळ, खोपोली भागात मुंबईतील माणूस कसा राहायला येईल? त्यात भरीस भर म्हणजे कर्जतला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पोहचण्यास साधारण दोन तासांचा अवधी लागतो. अशा वेळी कोण मुंबईतून येऊन कर्जत आणि नेरळ भागात राहील. त्याच वेळी कोण येथून पुढे नोकरीसाठी दोन तासांच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा एक लोकल चुकली की दुसर्‍या लोकलची वाट पाहायला एक तासाहून अधिक वेळ वाट पाहील. मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून कर्जत तालुका अजूनपर्यंत विकासाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्यात कर्जत तालुका मागील काही वर्षांत येथे आलेल्या शैक्षणिक संकुलामुळे या भागात मुंबईच्या उपनगरातील विद्यार्थी शिक्षण घ्यायला येत असतात. त्या विद्यार्थ्यांनी तर प्रचंड प्रमाणात उपनगरीय लोकल व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. हजारोंच्या संख्येने कर्जत तालुक्यात अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांनी सह्या करून उपनगरीय लोकलची मागणी केली होती, मात्र आज 2020मध्ये ठरावीक वेळ सोडता कर्जतला मुंबई येथून येण्यासाठी तासाला आणि दीड तासाच्या अंतराने लोकल आहेत. ही बाब या भागाच्या विकासाला मारक आहे, पण मध्य रेल्वेला त्याचे काही सोयरसुतक नाही असे दिसून आले आहे. मागील पाच वर्षांत कर्जत भागात जाण्यासाठी मुंबई येथून पाच उपनगरीय लोकलदेखील वाढल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आधी विरार फास्टसारख्या आणि पनवेलसारख्या 10 किंवा 15 मिनिटाला लोकल गाड्यांची सोय करण्याची गरज आहे. मुंबई येथून कर्जत आणि खोपोली या लोकलचा विचार करता कर्जतला येण्यासाठी सकाळी 6नंतर पहिली लोकल पोहचते. त्यानंतर 9 वाजेपर्यंत अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत लोकल उपलब्ध आहेत, पण त्यानंतर येणारी लोकल 50 मिनिटांनी, तर त्यानंतर कर्जत लोकल एक तास 10 मिनिटांनी आहे. त्यात दुपारच्या वेळी एक वाजून 40 मिनिटांनी लोकल सुटल्यानंतर पुन्हा मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कर्जतला यायला साडेतीन वाजता खोपोली लोकल आहे. अगोदरच मुंबईवरून कर्जत, खोपोली या लांब पल्ल्याच्या अंतरावर खूपच कमी लोकलगाड्या सोडल्या जात असल्यामुळे लोकलगाड्यांना प्रचंड गर्दी होऊन अपघात होत असतात. त्यातच भरदुपारच्या वेळेस एक तासापेक्षा जास्त वेळ कर्जत, खोपोली येथील प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकात ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ नाहक वाया जात असतो.

दुपारी 1.40 ते 2.48 वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून कर्जत किंवा खोपोली जलद लोकल नाही. रात्री बारापर्यंत कर्जत येथून मुंबईला जाण्यासाठी लोकल पाहिजेत. त्यात त्या ठाण्यापर्यंत गेल्या तरी बदलत्या आणि विकासाच्या मार्गावर असलेल्या कर्जत तालुक्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते. कर्जत तालुक्याचा विकास मार्गावर येण्यासाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी ठाणे ते कसारा, कर्जत, टिटवाळा, बदलापूर लोकल फेर्‍यांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूर आणि कर्जतसाठी 12.22 ते 13.13 (51 मि.), 16.45 ते 17.25 (40 मि.), 19.55 ते 20.48 (53 मि.), तसेच कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे 14.16 ते 15.27 (71 मि.), 18.42 ते 19.45 (63 मि.), 19.45 ते 20.40 (55 मि.) या जादा लोकल सोडण्याची गरज आहे. सायंकाळी कर्जत येथून मुंबईकडे जाण्यासाठीदेखील अर्ध्या तासाने लोकल झाल्यास त्याचा फायदा कामगारवर्गाला होऊ शकतो.कर्जत येथून दुपारी सव्वा दोन वाजता लोकल सुटल्यानंतर नंतरची लोकल ही साडेतीन वाजता म्हणजे सव्वा तासाने आहे. ती लोकल गेल्यानंतर पुढील लोकल ही पाऊण तासाने आहे. नंतर तासाने गाड्या आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी कर्जत पॅसेंजर असोसिएशन प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांना मध्य रेल्वेने साथ देण्याची गरज आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply