सिडनी : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे दमदार पुनरागमन करतील, असा दावा केला आहे. वॉर्नर हाच यंदाच्या विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल, असाही अंदाज वॉर्नने व्यक्त केलाय.
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 30 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत तूल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. स्पर्धेसाठी प्रत्येक संघ खेळाडूंची चाचपणी करीत आहे; तर दुसरीकडे क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आणि जाणकार या स्पर्धेबाबत आपले अंदाज व्यक्त करीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न यानेही आपला ठोकताळा मांडला आहे.
कधी कधी तुम्हाला कारकिर्दीत कठोर प्रसंगांना सामोरे जावे लागते, मात्र त्यामुळे खेळाडू म्हणून तुम्हालाच फायदा होतो. नव्या उमेदीने तुम्ही पुन्हा एकदा क्रिकेटसाठी तयार होता. माझ्याही कारकिर्दीत 2003मध्ये असा काळ आला होता. माझे शरीर आणि माझे मन दोन्हीही ताजेतवाने होते. त्यामुळे मी उत्तम कामगिरी करू शकलो. अशाचप्रकारे स्मिथ व वॉर्नर यांच्यातील धावांची भूक आता अधिक वाढलेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळेच विश्वचषकात ते सर्वस्व पणाला लावतील. त्या दोघांनाही सूर गवसल्यास ऑस्ट्रेलियाला सलग दुसरा विश्वचषक जिंकण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही, असे वॉर्नने म्हटले आहे.