Breaking News

वीजपुरवठा 20 तास खंडित; कर्जत शहरात ‘महावितरण’विरोधात संताप

कर्जत : बातमीदार

शहराचा वीज पुरवठा 1 ऑक्टोबर रोजी पहाटे खंडित झाला होता. तो पूर्ववत होण्यासाठी तब्बल 20 तास लागले. तोपर्यंत  कर्जत शहर अंधारात बुडाले होते. ऐन नवरात्र उत्सव आणि निवडणूक काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत असून, अर्धा दिवस बिघाड शोधण्यात गेल्याने महावितरणच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्जत शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. त्यानंतर महात्मा गांधी जयंती सर्वत्र साजरी होत असताना कर्जत शहरात वीज नव्हती. दरम्यान, दुरुस्तीच्या कामासाठी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहील आणि सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी वीज पुरवठा पुन्हा सुरू होईल, असे मेसेज महावितरणकडून शहरात फिरविण्यात आले. या काळात महावितरणचे कर्मचारी वीज पुरवठा कशामुळे खंडित झाला हे शोधत होते. कर्जत चारफाटा परिसरात विजेचे खांब कोसळले असून तेथे नवीन खांब उभारल्यानंतर वीज पुरवठा पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन महावितरणने दिले होते. प्रत्यक्षात मात्र तालुक्यातील कळंबोली येथून कर्जत शहरातील भिसेगाव येथे असलेल्या स्वीचिंग स्टेशनला वीज आणणारी केबल जळाल्याचे प्रकरण बाहेर आले. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजता काही वेळासाठी वीज पुरवठा सुरू झाला आणि पुन्हा खंडित झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कर्जत शहरातील नागरिकांची रात्र अंधारात जाणार हे नक्की झाले. तेव्हा शहरातील नागरिकांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी तर मालवाडी येथे रस्त्यावर पडलेल्या केबलबाबत जनजागृती करून अपघात होणार नाही याची काळजी घेतली तसेच दिवसभर राबत असलेल्या वीज कर्मचार्‍यांना चहा-नाश्त्याची सोय करून त्यांच्या श्रमांना हातभार लावण्याचा प्रयत्न केला.  बुधवारी पहाटे तीनपासून खंडित झालेला पुरवठा मध्यरात्र उलटण्याची वेळ आली तरी पूर्ववत होत नसल्याने कर्जतमधील नागरिक संताप व्यक्त करू लागले. सोशल मीडियावर तर कर्जतमधील वीज पुरवठ्याबद्दल महावितरणची लक्तरे काढली गेली. दरम्यान, वीज पुरवठा सुरू व्हावा यासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता आनंद घुले, शाखा अभियंता सांगळे यांसह कर्मचारी पडलेली केबल बाजूला काढण्यासाठी रात्रीचा दिवस करीत होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply