भारतीय जनता पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन नुकतेच नवी मुंबईत झाले. या अधिवेधनात पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करताना राज्यात अपघाताने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे येत्या काळात भाजप विरुद्ध ठाकरे सरकार हा सामना जोरदार रंगण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, तर सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले, पण हार मानेल तो भाजप कसला. भाजपकडून महाविकास आघाडीवर प्रहार करण्याची एकही संधी दवडली जात नाहीए. मुळात हा पक्ष अभ्यासू, विद्वान लोकांचा आहे. त्यातच समोर परस्परविरोधी विचारधारा असलेल्या पक्षांचे सरकार असून, त्यांच्यात विसंवाद झाल्यावर भाजप कसा गप्प बसणार? हा संघर्ष आता अधिक प्रखर होणार, हे भाजपच्या नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी अधिवेशनातून स्पष्ट झाले आहे. नेरूळ येथे झालेल्या या दोनदिवसीय अधिवेशनाला भाजपचे राज्यभरातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये विविध सत्रे झाली. दुसर्या दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन नवी मुंबईत झाले असले, तरी त्याचा प्रमुख रोख हा राज्याच्या सत्तेवर बसलेल्या महाविकास आघाडी सरकारला पायउतार करण्यासाठी लढत राहणे हाच आहे. याची जाणीव एव्हाना सरकारमध्ये सहभागी असलल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या पक्षांनाही झाली असेल. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘विश्वासघात तर झालेलाच आहे, पण आता रडायचे नाही, तर लढायचे’ असे सांगून आपला लढाऊ बाणा पुन्हा एकदा अधोरेखित केला. मध्यंतरी फडणवीस यांना दिल्लीत पाचारण केले जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या होत्या. त्यावर खुद्द फडणवीस यांनीच मुंबईतील एका कार्यक्रमात महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईपर्यंत मी कुठेही जाणार नाही, असे सांगून टाकले होते. तेच फडणवीस आताही भाजपचे राज्यातील सरसेनापती आहेत. प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा संधी देऊन पक्षनेतृत्वाने योग्य संतुलन साधले आहे. चंद्रकांतदादांनीही अधिवेशनात विरोधकांचा समाचार घेतला. ‘सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, तर त्यांच्यातील विसंवादच सरकार पाडेल’ हे प्रदेशाध्यक्षांचे विधान त्यांच्यातील परिपक्वता दाखवते. खरे परस्पर सहमतीवरच या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सत्तेसाठी शिवसेना वाटेल त्या तडजोडी करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसकडून केलेला अपमान, राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे पुरावे मागणे यावर पूर्वीच्या शिवसेनेने पेटून उठून जोरदार समाचार घेतला असता, पण आता मात्र हाच ‘वाघ’ शेळी बनून शेपटी घालत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे सरकार असलेल्या मध्यप्रदेशात छत्रपती शिवरायांचा पुतळा जेसीबीने हटवून या महापुरुषाची विटंबना करण्यात आली. त्यावरही शिवसेना आपल्या नव्या मित्रपक्षाला दरडावण्यास तयार नाही. आता हे कुठवर चालते ते पाहू या. भाजपने मात्र स्वबळावर आणि पूर्ण ताकदीनिशी लढण्याचा नारा दिला आहे.