चला, परीक्षेवर बोलू काही..!

उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. 18)पासून सुरुवात होत आहे. यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिलेली आहेच. परीक्षेच्या काळात सर्वात जास्त तणावाखाली कोण असतो तर तो विद्यार्थी आणि त्याचे पालक मंडळी. विशेषकरून बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी अधिक तणावाखाली वावरत असतात. त्यांचे आई-वडीलदेखील आपल्या मुलांच्या भविष्याबाबत अधिक काळजी करीत चिंताग्रस्त होतात. या सर्वांना मार्गदर्शन करणे आणि योग्य दिशा देण्यासाठी कोणी तर असायला हवं असं नेहमी वाटत राहायचं, पण यांना सांगावं कोण हा प्रश्न अनुत्तरित राहत होता. अखेर 2018 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा नावाचे कार्यक्रम घेतले आणि बोर्डाची परीक्षा देणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले.

ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असते. तेव्हा याच काळात त्या विद्यार्थ्यांना घरातील मंडळी अभ्यास कर या एकाच गोष्टीखाली तणावात ठेवतात आणि ते स्वतःदेखील तणावग्रस्त होतात. पहिल्या वर्षी झालेल्या त्या कार्यक्रमाने अनेक विद्यार्थी प्रभावित झाले होते. परीक्षेचा पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या याच महिण्यात भरपूर मोठ्या प्रमाणावर आढळत असे, मात्र ‘परीक्षा पे चचार्’मुळे विद्यार्थ्यांना अधिक बळ मिळून यात थोडीशी का होईना घट होण्यास मदत झाली आहे. प्रत्येक मुलांच्या आयुष्यात बोर्डाची परीक्षा महत्त्वाची असते. याच परीक्षेच्या गुणांकनावरून पुढील दिशा ठरते. म्हणून प्रत्येक जण या बोर्डाच्या परीक्षेला महत्त्व देतात, पण तहान लागली म्हणून विहीर खणण्यात काही अर्थ असतो का? याचा विचार व्हायला पाहिजे. नुसती बोर्डाची परीक्षा आहे म्हणून जास्त अभ्यास करून चालणार नाही तर अभ्यास करण्याची सवय आपणास असायला हवी. पहिल्या वर्गापासून बोर्डाच्या वर्गापर्यंत अभ्यास करण्याची पद्धत बदलत नेऊन तसे अभ्यास करणे आवश्यक आहे. कामाचे तणाव घेऊन कधीही काम योग्यरित्या होत नाही. उलट शांत डोक्याने केलेले काम हळू पण खूप चांगले होते. अभ्यासासोबत आपल्या काही चांगल्या सवयी आणि छंद चालूच ठेवायला हवं, कारण आपली आवड किंवा छंद हे आपल्या मनाला विरंगुळा देत असतात. मन प्रसन्न आणि आनंदी असेल तर अभ्यासातदेखील चांगले मन लागेल. म्हणून आपले मन प्रसन्न ठेवण्यासाठी आपले छंद आणि आवड जपायलाच हवे. कोणाला गाणे गाण्याची आवड असते, कोणाला क्रिकेट खेळण्याची आवड असेल, कोणाला पेटी-तबला वाजविण्याची छंद असेल, कोणाला चित्रकलेचा छंद असेल तर ते आपले छंद अभ्यासाच्या सोबत जोपासायचे.

प्रत्येक मूल भिन्न असते. म्हणून इतर मुलांसोबत आपली स्पर्धा न लावता आपल्यासोबत लावावी. मेंदूला नियमितपणे काही काम लावत गेल्यास आपला मेंदू कार्यतत्पर राहतो, तर आळशी माणसाचे मेंदू काहीच काम करीत नाही असे म्हणण्यापेक्षा वेळेवर काम करत नाही. म्हणून आपल्या मेंदूला त्रास होईल असा तणाव परीक्षेच्या काळात घेऊच नये. त्याऐवजी आपल्या मेंदूला प्रसन्न ठेवण्यासारखे काम करावं. परीक्षेच्या काळात शक्य होईल तितके प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना यशाजवळ घेऊन जातो, पण बहुतांश विद्यार्थी ऐन परीक्षेच्या काळात जास्त अभ्यास करत जागरण करतात आणि त्याचा परिणाम मेंदूवर होतो. मग परीक्षेच्या तीन तासाच्या काळात गोंधळून जातात. काही जण तर या काळात जेवणाकडेही लक्ष देत नाहीत आणि आजारी पडतात. या काळात जर आपले शरीर साथ दिल नाही तर एका वर्षाची मेहनत पाण्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या आहाराकडे लक्ष देणेदेखील आवश्यक आहे. पालकांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

या सर्व बाबींची चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून केली आहे. तिसर्‍या वर्षीदेखील त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता ते खरोखरच प्रशंसनीय आहे. आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी कोणी असा कार्यक्रम आयोजित केला नव्हता. आपले आदर्श व्यक्ती जर काही सूचना आणि मार्गदर्शन करीत असतील, तर इतर मंडळी त्यांचे अनुकरण करतात हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आपला मेंदू आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचे बोलणे ऐकतो व तशी कृती करतो. म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होत आला आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा ताण न घेता परीक्षा द्या. पास किंवा नापास ही क्रिया चालत राहते. बोर्डाच्या परीक्षेत नापास झालेली अनेक विद्यार्थी जीवनात खूप मोठे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून आनंदी मनाने परीक्षेला सामोरे जा. यश नक्की मिळेल असा आत्मविश्वास ठेवा. सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा!

-नागोराव येवतीकर, धर्माबाद

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply