हरिश बेकावडे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
पेण : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यामध्ये गुटखा विक्रीचा धंदा तेजीत असून, तो पुर्णत: नष्ट करण्यास प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हरिश बेकावडे यांनी पेणमधील शासकीय विश्रामगृहात घतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
जिल्ह्यात ठिकठिकाणी भाड्याने जागा घेवून मुंबईतील एक व्यक्ती तेथे गुटख्याचा पुरवठा करीत असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना, त्यांच्या नवी मुंबई येथील कार्यालयात दिल्यानंतर पालघर गुन्हे अन्वेषण विभागाने 28 जानेवारी रोजी नागोठणे व कुरूळ येथील गोडावुनवर धाड टाकून गुटखा बनविण्यासाठी लागणार्या घातक केमिकल्ससह लाखो रूपयांचा गुटखा जप्त केला होता. रायगडमध्ये येवून पालघर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने कारवाई होते, मग रायगड गुन्हे अन्वेषण विभागाकडून कारवाई का होत नाही? असा सवाल हरिश बेकावडे यांनी यावेळी केला.
अनेक ठिकाणी कारवाई होऊनसुद्धा रायगड जिल्ह्यात राजरोस गुटखा विक्री चालू असून, त्याकडे गुन्हे अन्वेषण विभाग व अन्न औषध प्रशासन अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असून, याबाबत सखोल चौकशी व्हावी, याकरिता कोकण विभाग पोलीस महानिरीक्षक, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच गृहमंत्र्यांना निवेदन दिले असल्याचे बेकावडे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.