मुंबई : प्रतिनिधी
अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आयुष्यभर शरद पवार यांनी मतांचे तुष्टीकरण करण्याचे काम केले. खुर्चीसाठी पक्ष फोडले, अशी घणाघाती टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने ट्रस्ट स्थापन करा आणि अयोध्येत मशीद बांधा, असेही ते म्हणाले.
राम मंदिर बांधण्यासाठी तुम्ही ट्रस्टची स्थापना केली. मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का स्थापन करता आली नाही, असा सवाल शरद पवार यांनी केंद्र सरकारला केला होता. देश तर सर्वांचा आणि सर्वधर्मीयांचा आहे, असेही ते म्हणाले होते. शरद पवार यांच्या या विधानावरून आता भाजप आक्रमक झाला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या वक्तव्यावरून शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पवार यांनी खुर्चीसाठी पक्ष फोडले. आयुष्यभर त्यांनी मतांचे तुष्टीकरण केले. तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने ट्रस्ट स्थापन करून अयोध्येत मशीद बांधा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे, मग आरोप करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी पवार यांना केला.
आम्ही रडणारे नाहीत, लढणारे आहोत
दरम्यान, तत्कालीन भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे अहवाल महाविकास आघाडी सरकार राज्य विधिमंडळ अधिवेशनात मांडणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत माध्यमांनी मुनगंटीवार यांना विचारणा केली असता तसे केल्यास स्वागतच आहे, असे ते म्हणाले. युतीच्या सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांवरही आरोप झाले होते. मग सर्वांचेच अहवाल मांडण्यात यावेत. आम्ही रडणारे नाहीत, तर लढणारे आहोत. ईडीची चौकशी लागली की रडायला सुरुवात होते. थयथयाट केला जातो, असा टोलाही त्यांनी लगावला.