पनवेल : वार्ताहर
मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार म्हणून पार्थ पवार यांचे नाव पुढे येत आहे, परंतु ते नवखे उमेदवार असल्याने गेली पाच वर्षे
मतदारसंघात जनतेसाठी सदैव झटणारे युतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे हेच पुन्हा निवडून येतील, असा ठाम विश्वास शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी व्यक्त केला. ते तळोजा उपशहरप्रमुख महेश भोईर यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, पार्थ पवार हे नवखे आहेतच, शिवाय पवार कुटुंबीयांतील नावात आता विश्वासार्हता राहिली नाही. काही महिन्यांपूर्वी पार्थ पवार यांनी निवडणुकीची तयारी केली होती आणि तसे बॅनर्ससुद्धा लावले होते, परंतु अचानक त्यांची उमेदवारी मागे पडली व स्व. आर. आर. पाटील यांच्या कन्येचे नाव पुढे आले. त्यानंतर आता पुन्हा एकदा पार्थ पवारांचे नाव चर्चेत आले आहे व पुन्हा त्यांचे नाव मागेसुद्धा पडू शकते. त्यामुळे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेच पुन्हा प्रचंड मतांनी निवडून येतील.
-शेकापचे सोयीचे राजकारण
या वेळी पाटील यांनी शेकापचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले की, शेकाप नेहमीच सोयीचे राजकारण करीत असतो. शेकापकडे स्वतःचा उमेदवार नसल्याने ते उसन्या उमेदवारांना पाठिंबा देतात. ते स्वतः का लढत नाहीत, असा सवालही त्यांनी या वेळी केला. शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकदिलाने काम करून या वेळीही श्रीरंग बारणे यांना खासदार करतील, असा ठाम विश्वासही पाटील यांनी शेवटी व्यक्त केला.