नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात भागीरथी अम्मा, काम्या कार्तिकेयन यांच्यासह पूर्णियाच्या महिलांचे कौतुक केले, तसेच या कार्यक्रमात पंतप्रधानांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) युवा विज्ञानी कार्यक्रम अर्थात ’युविका’चाही उल्लेख केला.
12 वर्षीय काम्या कार्तिकेयन हिने दक्षिण अमेरिकेचे सर्वांत उंच शिखर (7 हजार मीटर उंच) असलेल्या माऊंट एकोनगोवाच्या माथ्यावर तिरंगा फडकावला. यानंतर आता काम्या आणखी एका मिशनवर आहे. ’मिशन साहस’द्वारे ती प्रत्येक खंडातील सर्वांत उंच शिखर सर करणार आहे, असे सांगून पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात 105 वर्षीय भागीरथी अम्माची कहाणीही मांडली. केरळच्या कोल्लममध्ये राहणार्या अम्माने परीक्षेत 75 टक्के गुण मिळवलेत. गणितात त्यांना 100 पैकी 100 गुण मिळालेत. त्यांना अजूनही पुढे शिकण्याची इच्छा आहे. मी त्यांना प्रणाम करतो, असे मोदींनी म्हटले. सरकारच्या सहकायार्र्ने मलबेरीची उत्पादने, रेशीम धागे बनवणे, तसेच याच धाग्यांपासून साडी बनवून विकणार्या पूर्णियाच्या महिलांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.
तरुणांना विज्ञानाशी जोडण्यासाठी इस्रोने ’युविका’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ’मन की बात’मध्ये दिली.