सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; नागरिक त्रस्त
उरण : प्रतिनिधी : उरण तालुक्यातील राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या खोपटा पूल ते कोप्रोली नाका दरम्यान पडलेल्या खड्डयांचा विसर सार्वजनिक बांधकाम खात्याला पडला असून पूर्व विभागातील युवकांना दिलेली आश्वासने ही कागदावरच असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून, रस्त्याच्या सुमार दर्जा आणि या मार्गावरून चाललेली अवजड वाहतूक त्यामुळे येथील रस्ते हे पावसाळ्यातच पूर्णपणे खड्डेमय झाले. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणार्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर अपघात ही होण्याचा धोका बळावला आहे.
मात्र ही बाब पूर्व विभागातील युवकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणून दिली. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी हा रस्ता उत्तम दर्जाचा बनविला जाईल असे आश्वासन ही दिले. मात्र या रस्त्यावर फक्त तात्पुरत्या स्वरूपात वरच्या वर खड्डे बुजण्यात आले. मात्र हे बुंजलेले खड्डे निकृष्ट दर्जाचे बनविले असल्याकारणाने या युवकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे उत्तम दर्जाचे रस्ते बनविण्यासाठी अर्ज ही करण्यात आले, आंदोलन ही करण्यात आले. मात्र आज तागायत या परिसरातील युवकांच्या हाती आश्वासनांशिवाय काहीच हाती पडले नाही. आज रस्ता बनविला जाईल उद्या बनविला जाईल याच पोकळ आश्वासनावर या परिसरातील युवक आणि जनता आहे. मात्र या खड्ड्यापासून मुक्तता कधी मिळणार आणि उत्तम दर्जाचे रस्ते कधी बनणार हा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. तसेच हा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनविणार्या ठेकेदावर कारवाई करावी अशी मागणी ही जनतेकडून होत आहे.
या रस्त्याच्या खड्डे बुजण्यासाठी गट ब मधून मागणी केली आहे. मंजूर झाल्यावर ते केले जाईल.
-पी. टी. सूर्यवंशी, शाखा अभियंता
आम्ही पूर्व विभागातील युवकांनी हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी सतत मागणी करत आहोत आणि याचा पाठपुरावा ही करत आहोत यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना पाहणीसाठी ही घेऊन आलो आहोत, परंतु ज्या वेळी कंत्राटदार खड्डे बुजण्यासाठी काम करत असतो तेव्हा या खात्याचे एकही अधिकारी कामाच्या ठिकाणी नसतात. त्यामुळे कंत्राटदार कामाचा दर्जा देत नाही.
– गोरख ठाकूर, नागरिक, खोपटे