Breaking News

न्यूझीलंडकडून भारताचा धुव्वा

पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय

वेलिंग्टन : वृत्तसंस्था
कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात यजमान संघाने भारतावर 10 गडी राखून मात केली. तळातल्या फलंदाजांनी डावाच्या पराभवाची नामुष्की टाळली. दुसर्‍या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ 9 धावांचे आव्हान दिलं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करीत न्यूझीलंडला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे.
वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसर्‍या डावातही भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे भारतीय संघ दुसर्‍या डावात फक्त 191 धावांपर्यंत मजल मारू शकला. तिसर्‍या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ 39 धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला.
यानंतर भारताचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्वीकारण्याची वेळ आली होती, पण अखेरच्या फळीत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करीत भारताचा लाजीरवाणा पराभव टाळला, मात्र न्यूझीलंडच्या मार्‍यासमोर हे फलंदाजही फारवेळ तग धरू शकले नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आक्रमक क्षेत्ररक्षण लावत भारतीय फलंदाजांना धावा करण्याची संधीच दिली नाही. दुसर्‍या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊदीने पाच, तर ट्रेंट बोल्टने चार बळी टिपले. याव्यतिरिक्त डी-ग्रँडहोमने एक गडी बाद केला. न्यूझीलंडचा हा शंभरावा विजय ठरला आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply