कर्जत : बातमीदार
युनियन बँक ऑफ इंडियाच्या माथेरान शाखेने येथील नौरोजी उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या आवारात पाणपोई बसवली आहे. त्या पाणपोईचा उपयोग पर्यटकांना पाणी पिण्यासाठी होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या पाणपोईचे नळ अज्ञातांनी तोडले आहेत. त्यामुळे या पाणपोईला पाणी येणे बंद झाल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत.
माथेरान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही पाणपोई असून, या दोन्ही उद्यानात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पर्यटकांना या पाणपोईचा आधार घ्यावा लागतो. पण या पाणपोईचे नळ तुटल्याने पाणी येणे बंद झाले आहे. मागील शुक्रवारी महाशिवरात्र, शनिवार व रविवार लागून आल्याने माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. येथील उद्याने पर्यटकांनी भरून गेली होती. पण तेथील पाणपोई बंद असल्यामुळे पर्यटकांना पाण्यासाठी वणवण करून दुकानातून पाणी विकत घेऊन प्यावे लागले. नगरपालिका माथेरानमध्ये येणार्या प्रत्येक पर्यटकाकडून 50 रुपये करस्वरूपात घेते, पण पर्यटकांना साधी पिण्याच्या पाण्याची सोय करीत नाही, याबाबत पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
-या पाणपोईच्या बाजूलाच नगरपालिकेने शुद्धजल मशीन बसविली आहे. तिच्यामध्ये पैसे टाकून पाणी मिळते. त्यामुळे येथील पाणपोई हळूहळू बंद करण्याचा डाव आहे, असे येथील दुकानदारांची म्हणणे आहे.
युनियन बँकेने उभारलेल्या पाणपोईमधून पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय होत असते. पण गेल्या काही दिवसांपासून पाणपोईचे नळ चोरीला गेले आहेत, मात्र त्याकडे नगरपालिका लक्ष देत नाही. त्यामुळे पर्यटक आमच्या दुकानातून पाणी विकत घेत आहेत. -निलेश परदेशी, दुकानदार, माथेरान.
माथेरानमधील उद्याने खुप सुंदर आहेत. आम्ही दोन ते अडीच तास या उद्यानात बसलो. मात्र तेथील पाणपोईला नळच नसल्याने तिथे पाणी मिळाले नाही. समोरच्या दुकानातून पाणी विकत घ्यावे लागले. जर आम्हाला नगर परिषद पाण्याची सोय करीत नसेल, तर आमच्याकडून 50 रुपये कर का घेतात? -सुजित म्हात्रे, पर्यटक, डोंबिवली