महसूल विभागाची कारवाई
मुरूड : प्रतिनिधी
तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीमधील मिठागर भागात अवैध उत्खनन सुरू होते. त्याबाबत माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने धाड टाकून सुमारे 75 हजारांचा वाळूसाठा जप्त केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. मिठागर येथील वाळू घाट परिसरात अवैधरीत्या वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार गमन गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रवींद्र सानप, प्रल्हाद कौटुंबे, मंडळ अधिकारी विजय म्हापुस्कर, तलाठी रूपेश रेवस्कर, रेश्मा वीरकुड, वनिता जायभाय, कोतवाल संदीप कोम यांच्या पथकाने तेथे धाड टाकली. त्याचा सुगावा लागताच तेथील इसम पळून गेले. सक्शन पंप अथवा बोटसुद्धा मिळाली नाही, मात्र त्या ठिकाणी असलेला सुमारे 75 हजारांचा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे.