मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविले आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि. 5) सादर केलेले ऐतिहासिक जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 125 विरुद्ध 61 मतांनी राज्यसभेत मंजूर झाले. त्यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी सकाळी संसदेत जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. सायंकाळी राज्यसभेत जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक मांडण्यात आले. त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. शहा यांनी या चर्चेला उत्तर देताना सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी विधेयकावर मतदान घेतले. 125 विरुद्ध 61 मतांनी हे विधेयक मंजूर झाले.
सर्वांना एकतेची जाणीव होईल : रामशेठ ठाकूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या टीमने आज काश्मीरमधील 370 कलम रद्द केले हा अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, काश्मीर प्रश्नावर आपल्या सरकारचा आणि देशाचा जास्तीत जास्त वेळ व पैसा खर्च होत होता. त्यावर उत्तम तोडगा काढला आहे. आपले जवान आणि पोलीस तिथे बंदोबस्तासाठी गेल्यावर त्यांच्यावर दगडफेक करून किंवा मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली जात होती. ते प्रकार या निर्णयामुळे थांबतील. आपण भारतीय आहोत. आपल्याला संचार, विचार आणि भाषण स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. काश्मीरमध्ये गेलेल्या माणसाला आपल्यावर कधी, कोठून हल्ला होईल अशी भीती वाटत असे. आजच्या या निर्णयाने आम्ही सगळे एक आहोत तसेच काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे याची जाणीव सर्वांना होईल.
काश्मीरमध्ये 370 कलम लागू केले त्या वेळची आणि आजची परिस्थिती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हे 370 कलम आज लागू राहणे चुकीचे होते. काश्मिरी आणि भारतीयांत वेगळेपण दिसत होते. त्यामुळे एकत्र येण्यात अडचण येत होती. आज हे कलम रद्द केल्याने ही अडचण दूर झाली आहे. त्यामुळे भारतीयांना काश्मीरमध्ये जमीन घेता येईल, उद्योगधंदे सुरू करता येतील. त्याचा फायदा काश्मीरमध्ये रोजगार निर्माण होण्यासाठी होईल. त्यामुळे काश्मिरी जनता राष्ट्रीय प्रवाहात सहभागी होईल.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका