पत्नीसह सात आरोपींना अटक
उरण : प्रतिनिधी
प्रापर्टीच्या वादातून व पत्नीला सोडून दुसर्या महिलेसोबत मौजमजा करणार्या पतीला संतप्त झालेल्या पत्नीनेच सहकार्यांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची घटना न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 36 तासांतच शिताफीने तपास करीत गोव्यातून तीन महिलांसह पाच व्यक्तींना अटक करून अपहरण झालेल्या पतीची पोलिसांनी सुखरूपपणे सुटका केली आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, विजयाराजन चेट्टीयार (वय 45) हे मुळचे तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत. विजय राजन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी असून नवी मुंबई सीवुड येथे त्यांचे कार्यालय आहे. तसेच नवी मुंबईतच ते मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्याची विवाहित पत्नी अलगु मिनाक्षी विजयाराजन चेट्टीयार तामिळनाडू येथेच वास्तव्यास आहे.पती-पत्नीत मालमत्तेसाठी वादविवाद असल्याने त्यांनी तामिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.घटस्फोटाचा न्यायालयात खटला सुरू असतानाही विजयाराजन चेट्टीयार हे नवी मुंबईत एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहात असल्याचे लगु मिनाक्षी यांना समजतले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीनेच आपल्या सहकार्यांच्या मदतीने पतीचेच अपहरण करून अद्दल घडवण्यासाठी कट रचला.
मिनाक्षी हिने दोन महिलांना पती विजयाराजन चेट्टीयार यांच्या सीवूड येथील कार्यालयात बनावट गिर्हाईक म्हणून पाठविले. प्रॉपर्टी दाखविण्यासाठी विजयाराजन हे उलवे येथील खारकोपर येथे दोन महिलांना घेऊन आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अपहरणकर्त्यांनी दोन महिलांच्या मदतीने बिल्डर्स विजयाराजन यांचे अपहरण करून गोव्याच्या दिशेने गाडीतून पलायन केले.
न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या अपहरणाची तक्रार दाखल झाली. विजयाराजन यांच्या मोबाइल नंबरवरुन मिळालेले लोकेशन आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन पोलिसांनी गोवा गाठले. तेथूनही निसटण्याच्या तयारीत असलेल्या अपहरणकर्त्यांना पोलिसांच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले.