Breaking News

खंडाळा घाटात टेम्पोने बाइकस्वारांना चिरडले

भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
अलिबाग बीचवर सुटीची मजा लुटून तळेगावकडे परतणार्‍या पाच तरुणांवर काळाने रविवारी (दि. 1) रात्री बोरघाटात घाला घातला. भरधाव टेम्पोने लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या पाच जणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण या अपघातातून बचावला आहे.
मूळचे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी येथील आणि सध्या कामानिमित्त तळेगाव वराळे फाटा येथे राहणारे सहा जण रविवारी सुटी असल्याने अलिबाग येथे पिकनिकसाठी आले होते. बीचवर मौजमजा करून परतताना ते बोरघाटात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग या जोडरस्त्याजवळ रात्री 10.30च्या सुमारास सुरक्षित जागी लघुशंकेकरिता थांबले होते. त्याच दरम्यान द्रुतगती मार्गावरून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने (एमएच 46 एफएच 1830) जुन्या मार्गावर येण्यासाठी वळण घेतले, मात्र चालकाचा ताबा सुटून हा टेम्पो एक बाजूला कलंडत रस्त्यानजीक थांबलेल्या दुचाकीस्वारांवर उलटला.
या अपघातात प्रदीप प्रकाश चोले (वय 38), अमोल बालाजी चिलमे (30), नारायण राम गुंडाळे (28), गोविंद न्यानोबा नलवाड (26) आणि निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (28) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा सहकारी बालाजी हरिश्चंद्र भंडारे (वय 35) हा काही अंतरावर असल्याने बचावला. अपघातानंतर टेम्पोचालकाने पळ काढला.
भीषण अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी, खोपोली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य, आयआरबीचे देवदूत पथक यांनी गोणींखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढले. खोपोली नगर परिषदेच्या दवाखान्यात पाचही जणांना मृत घोषित केल्यानंतर खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सोमवारी सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात सोपविण्यात आले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply