Breaking News

आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांचीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतली दखल -रामदास आठवले

मुंबई ः प्रतिनिधी
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर मी संसदेत काम केले. ते स्वच्छ अंत:करणाचे व सरळ मनाचे दानशूर नेते आहेत. मी त्यांना दीर्घ आयुरारोग्य चिंतितो, असे सांगून केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, आपत्कालीन परिस्थितीत सामान्य माणूस आणि पत्रकार यांचीही त्यांनी दखल घेतली ही बाब महत्त्वाची आहे.
कोरोना देवदूत पुरस्काराचे मानकरी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या किटचे वाटप करताना ते बोलत होते. मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी या किटचे वितरण करताना राज्यमंत्री आठवले यांनी
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला.  
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे होते. कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना वार्‍यावर सोडले असल्याची खंत वाबळे यांनी या वेळी व्यक्त केली. राज्यमंत्री आठवले यांनी पंतप्रधानांकडे पत्रकारांची बाजू मांडावी, असे आवाहन त्यांनी केले. तोच धागा पकडून आठवले म्हणाले की, कोरोना महामारीत अनेक पत्रकारांची वेतन कपात झाली असून बर्‍याच पत्रकारांना नोकर्‍यांना मुकावे लागले. इतर राज्यांत पत्रकारांना सवलती दिल्या जात असताना राज्य सरकार पत्रकारांची दखल का घेत नाही? असा सवाल त्यांनी केला.
 पत्रकारांना अशा आपत्कालीन परिस्थितीत सरकारच्या मदतीची गरज असून त्यांना विशेष पॅकेज मिळावे यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार फ्रंटलाईन वर्कर असून कोरोना काळात जीव धोक्यात घालून ते वृत्तसंकलन करतात. आघाडीवर राहून काम करणार्‍या पत्रकारांनाही सरकारने फ्रंटलाइन वर्करचा दर्जा द्यावा, असे आठवले म्हणाले. या वेळी आठवले यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही पत्रकार, कॅमेरामन व छायाचित्रकारांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघास अन्नधान्याचे किट दिल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी आभार मानले. या वेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काश्यप, कार्यवाह विष्णू सोनवणे व संयुक्त कार्यवाह खलिल गिरकर उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्वेस्टीचर समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर …

Leave a Reply