Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी कामगार सुरक्षेसाठी आग्रही; तळोजा एमआयडीसीसंदर्भात अधिवेशनात तारांकित प्रश्न

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षेबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी कामगारांची सुरक्षा जपा, असे शासनाला सूचित केले.

तळोजा एमआयडीसीत सन 2016-2017, सन 2017-2018 व सन 2018 ते जून 2019पर्यंत विविध कारखान्यांमध्ये स्फोट होऊन लागलेली आग व वायूगळती अशा विविध घटनांमुळे अनेक कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या औद्योगिक वसाहत परिसरातील 907 हेक्टर जागेवर 1200 भूखंडांवर शेकडो छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये मोठी औद्योगिक उलाढाल होत असून येथे इंजिनिअरिंग, मत्स्य प्रक्रिया, फूड, रसायने आदी कारखान्यांचा समावेश आहे. लाखो कामगार या कारखान्यांमध्ये काम करीत असून औद्योगिक वसाहतीमध्ये आपत्कालीन आराखडा नसल्याने कामगारांना व नागरिकांना कंपनीमध्ये होणार्‍या अपघाती घटनांमुळे आपला जीव गमवावा लागत आहे. यात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणी शासनाने चौकशी करून उक्त औद्योगिक वसाहतीमध्ये आपत्कालीन आराखडा तयार करून कामगारांच्या सुरक्षेकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न दाखल करण्यात आला होता.

या प्रश्नावर राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीत सन 2016 ते जून 2019पर्यंत एकूण 20 कारखान्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांत 11 कामगार मृत व चार कामगार जखमी झाले आहेत. चार कारखान्यांमध्ये स्फोटाच्या घटना घडल्या असून, त्यात सात कामगार जखमी झाले आहेत, तसेच एका कारखान्यात वायूगळतीची घटना घडली असून, त्यात दोन कामगार बाधित झाले आहेत. या घटना घडल्याचे त्या-त्या वेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या निदर्शनास येऊन त्यांच्यामार्फत संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. अतिधोकादायक व धोकादायक प्रक्रिया असलेल्या कारखान्यांनी आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार केल्या असून, त्यानुसार कारखान्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आले आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply