Breaking News

कर्जतच्या टोईंग व्हॅनला ब्रेक

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जतमधील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर तोडगा म्हणून मध्यंतरी येथे टोईंग व्हॅन सुरू केली आणि वाहतुकीचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू लागला, मात्र कराराची मुदत संपल्याने टोईंग व्हॅन बंद करण्यात आली. नगरपरिषदेने पाच वेळा निविदा काढूनही कुणीच प्रतिसाद न दिल्याने कर्जत शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधांतरितच राहिला आहे. रुंद केलेले रस्ते कुणासाठी बांधलेत हासुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्याला फेरीवाले व हातगाडीवाल्यांचा विळखा बसला आहे. वारेमाप रिक्षा परवाने देणे सुरू असल्याने रस्ते कमी आणि रिक्षा जास्त असे चित्र आहे. त्यातच जागा असेल तेथे रिक्षा लावण्याच्या प्रवृत्तीमुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसते. सकाळी चाकरमानी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी कसरत करावी लागते. रात्री बाजारपेठेतील रस्ता मोठा दिसतो आणि दिवस उजाडला की रस्ता भरगच्च असतो. कर्जतची वाहतूक समस्या सर्वांचीच डोकेदुखी झाली आहे. काही दिवस कर्जतमधील वाहतूक व्यवस्था चांगली राहते, मात्र नंतर पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती होते. मध्यंतरी टोईंग व्हॅनची तांत्रिक अडचण सोडवून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या उपक्रमाचे कर्जतकरांनी स्वागत केले होते. काही महिन्यांनी ही टोईंग व्हॅन बंद झाली. याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी सरकारी पोर्टलद्वारे माहिती विचारल्यावर नवीन आलेले मुख्याधिकारी पंकज पवार-पाटील यांनी पोलीस खात्याच्या सहकार्याने टोईंग व्हॅन ठेकेदाराची एक वर्षासाठी नियुक्ती केली होती. नेमणुकीची मुदत संपल्यानंतर ठेकेदाराने काम बंद केले. पाच वेळा निविदा काढूनही निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने टोइंग व्हॅन बंद करावी लागली, असे लेखी उत्तर कळवून सदर कामी पुन्हा निविदा प्रसिद्ध करून ठेकेदाराची नेमणुकीची कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्जतकरांना नव्या ठेकेदाराची नेमणूक होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply