पनवेल : रामप्रहर वृत्त
बॉक्सिंग खेळातील हिट इंडिया स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूलची विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे तिची राष्ट्रीय
स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य मुंबई सीटी बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने चेंबूर येथे आयोजित हिट इंडिया राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत सुधागड हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी योगिनी पाटीलने सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीमुळे तिची हरियाणातील रोहतक येथील नॅशनल अॅकॅडमीत होणार्या राष्ट्रीय
स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल सुधागड हायस्कूलचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी विशेष सन्मान कार्यक्रम आयोजित करून योगिनीचे कौतुक केले व तिला राष्ट्रीय
स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे, नवीन पनवेलच्या बांठिया हायस्कूलचे प्राचार्य भगवान माळी, सुधागड हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सरोज पाटील आदी उपस्थित होते.