नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संपूर्ण जगभर रविवारी (दि. 8) जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने महिलांच्या योगदानाला डूडल व्हिडीओ अर्पण केला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदी नारीशक्तीला सलाम करीत असतानाच त्यांनी आपल्या सोशल मीडियाचे नेतृत्व महिलांकडे सोपवले. मी यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे आता सोशल मीडियापासून दूर राहणार आहे. आज दिवसभर कर्तृत्व गाजवणार्या सात महिला माझ्या सोशल अकाऊंटवरून त्यांचा प्रवास आणि त्यांनी केलेल्या कामगिरीविषयी सांगणार आहेत. त्या तुमच्याशी माझ्या सोशल अकाऊंटवरून संवाद साधणार
आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्त साधून आपले सोशल मीडिया अकाऊंट अशा महिलांकडे सोपवून दिले की, ज्या महिलांची यशोगाथा जगासाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यानुसार नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट देशातील सुप्रसिद्ध महिलांनी हाताळले. महाराष्ट्राच्या बंजारा समाजातील महिलांना मोदींच्या ट्विटर हँडलवर संधी मिळाली. हस्तकलेचा आणि या कलेचा लघु-उद्योग उभारणार्या महिलांना मोदींनी आपले ट्विटर अकाऊंट दिले होते. गोरमाटी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत केली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त देशभरातील महिलांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. महिलांना आपल्या आशा-आकांशा पूर्ण करता याव्यात म्हणून आपण महिलांची सुरक्षा आणि त्यांचा सन्मान करण्याचा संकल्प करू या.
-रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
जागतिक महिला दिनानिमित्त देशातील तमाम नारीशक्तीला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या मान-सन्मानाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार सदैव तत्पर आहे. आम्ही नव्या धोरणांनुसार महिला सशक्तीकरणाच्या दिशेने प्रवास करीत आहोत. बेटी पढाओ, बेटी बचाओ अभियान एका नव्या उंचीवर आहे. -रमेश पोखरियाल, मनुष्यबळ विकासमंत्री