Breaking News

कमळ पुन्हा हसले!

ज्योतिरादित्य हे एका मातब्बर राजघराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याची नाळ महाराष्ट्रात पुरलेली आहे. संपूर्ण आयुष्य मध्यप्रदेशात व्यतीत करूनही त्यांनी महाराष्ट्राशी असलेले आपले नाते तोडलेले नाही. आपल्या वडिलांप्रमाणेच ज्योतिरादित्य देखील उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कारी आहेत.

गेली जवळपास दोन वर्षे ज्याची प्रतीक्षा होती ते घडते आहे. होलिकोत्सवाच्या शुभमुहुर्तावर मध्यप्रदेशात कमळ पुन्हा एकदा हसते आहे. काँग्रेसचे मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी अखेर गांधी परिवाराचे वलय आणि काँग्रेस पक्ष या दोन्हीचा त्याग केला असून भारतीय जनता पक्षातील त्यांचा प्रवेश निश्चित आहे. सिंदिया यांची एकप्रकारे ही घरवापसीच म्हणावी लागेल. गेली अठरा वर्षे ते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. किंबहुना काँग्रेसमधील हातावर मोजण्याइतक्या असलेल्या समंजस आणि खर्‍या अर्थाने जनप्रिय नेत्यांपैकी ते एक होत. त्यांचे पिता माधवराव सिंदिया हे काँग्रेसचेच नेते होते. परंतु त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात जनसंघाच्या बाळकडूनेच झाली होती. ज्योतिरादित्य सिंदिया यांची आजी म्हणजेच राजमाता विजयाराजे सिंदिया या भाजपच्याच ज्येष्ठ नेत्या होत्या आणि ज्योतिरादित्य यांची आत्या यशोधराराजे या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत. एकंदरीतच सिंदिया घराणे भाजपच्या मुशीतले आहे. गेले दीड तप ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसची साथ देत लोककल्याणाच्या मार्गावर वाटचाल केली. परंतु बदललेल्या परिस्थितीत या पक्षात काही अर्थ उरलेला नाही हे त्यांच्या लक्षात आले असावे. ‘देर आए दुरुस्त आए’ असेच त्यांच्याबाबत म्हणावे लागेल. आपल्या राजीनाम्याचे पत्र ज्योतिरादित्य यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवून दिले. ‘काँग्रेस पक्षात राहून लोकसेवा करणे आता अशक्य झाले असून ही वेळ नवा मार्ग चोखाळण्याची आहे असे मला वाटते’ असे त्यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. काँग्रेसच्या सद्यस्थितीवर त्यांनी नेमके बोट ठेवले आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचे अल्पमतातील कमलनाथ सरकार कसेबसे टिकाव धरून आहे. ज्योतिरादित्य यांच्यासारख्या वजनदार नेत्याला खड्यासारखे दूर ठेवण्याचे पक्षांतर्गत राजकारण मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुरूच ठेवले. त्याचे कडू फळ काँग्रेसच्या पदरात पडले आहे. हे घडणारच होते. गेल्याच आठवड्यात मध्य प्रदेशातील काँग्रेसचे पाच-सहा आमदार भाजपने पळवून नेल्याची हाकाटी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी उठवली होती. आपले राजकारण फसू लागले की ‘ऑपरेशन लोटस’च्या नावाने शिमगा करण्याची काँग्रेसची ही जुनी सवय आहे. ज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यानंतर काही तास उलटतात न उलटतात तोच तिथल्या काँग्रेसच्या 22 आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. थोडक्यात, मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार अखेरच्या घटका मोजत आहे. हेच लोण राजस्थान, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रात पसरले तर उरलीसुरली सत्ता देखील संपुष्टात येईल या विचाराने काँग्रेस पक्षश्रेष्ठी भयग्रस्त झाले असतील तर त्यात नवल ते काय? कारण या तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अतिशय कमी जागांच्या फरकाने सत्ता गमवावी लागली होती. साहजिकच या तिन्ही राज्यातील सत्ताधार्‍यांसाठी ज्योतिरादित्य यांचा भाजप प्रवेश प्राण कंठाशी आणणारा आहे. ग्वाल्हेर आणि गुणा या दोन्ही मतदारसंघात लोकप्रिय असलेल्या ज्योतिरादित्य यांना राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर बसण्याची संधी मिळू शकेल. याला होलिकादेवीचा प्रसाद म्हणूनच स्वीकारायला हवे.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply