
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना या वैश्विक संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवणार्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता दुतांवर गुरुवारी खांदा वसाहतीत पुष्पवर्षाव करण्यात आला. इतकेच नाही. तर या कामगारांना आठ दिवस पुरेल इतके धान्य देऊन एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यासाठी ज्येष्ठ नगरसेविका सिता सदानंद पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला. लॉकडाऊन काळातही पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. मनपा क्षेत्रातील रस्ते, पदपथ स्वच्छ करणे, झाडू मारणे, झाडाचा पालापाचोळा जमा करणे, डोअर टू डोअर जाऊन कचरा संकलित करणे, परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे, पावडर मारणे यासारखी अनेक कामे संबंधित स्वच्छता दूत करीत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कमालीची स्वच्छता दिसून येते. अशाप्रकारे वैश्विक संकटात तसेच साथीच्या रोगाचा संसर्ग होत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणार्या या स्वच्छता दुतांचे काम खर्या अर्थाने कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल खांदा वसाहतीत नगरसेविका सिताताई सदानंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्यासह इतरांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. वसाहतीतील पाण्याच्या टाकीचा येथे गुरुवारी स्वच्छता कर्मचार्यांना आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले. सामाजिक अंतराने या सर्वांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना जीवनावश्यक कोरडा शिधा वाटप करण्यात आला. त्यासाठी पाटील व खाडे यांच्यासह शशिकांत खाडे, ज्ञानेश्वर देशमुख व शशिकांत योगे यांनी योगदान दिले. या वेळी उपसचिव रविंद्र गुरव, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, सदानंद पाटील, भाजपच्या महिला कार्यकर्त्या अनिता रासकर चेतन जाधव, मिथुन दर्गे, तन्मय सावंत उपस्थित होते.
गरजूंना मदतीचा हात
अडचणीत सापडलेल्या नागरिकांना नगरसेविका सिता पाटील यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये अन्नदान केले. त्याचबरोबर सेक्टर सात येथील एक हजारांपेक्षा जास्त कुटुंबियांना आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला वाटप केला. याशिवाय नागरिकांच्या अडचणी, समस्यांचे त्या निराकरण करत आहेत. गरीब गरजूंना मदतीचा हात देत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper