पनवेल : वार्ताहर
दुबईतील शारजामध्ये झालेल्या 10पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट
स्पर्धेत सहभागी होऊन भारतात परतलेल्या रायगड जिल्ह्यातील खेळाडूंची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
10पीएल स्पर्धेच्या यंदाच्या तिसर्या पर्वात 20 संघ खेळले. यात पनवेलसह रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता. भारतात यापूर्वी इटली आणि दुबईवरून आलेल्या प्रवाशांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे आता मायदेशी परतलेल्या क्रिकेटपटूंचीही तपासणी केली जाणार आहे. पहिल्या विमानातून आलेल्या जवळपास 16 जणांना रायगडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची ने-आण करण्यासाठी पनवेल महापालिकेने गाड्यांची व्यवस्था केली होती. या रुग्णालयामध्ये सर्व खेळाडूंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर दुसर्या विमानाने आणखी 20 जण येणार असून या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. या जवळपास 40 जणांना पुढील 14 दिवस खारघरमधील ग्रामविकास भवनात निरीक्षणासाठी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.