विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोफत मास्कवाटप
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील शाळेतील विद्यार्थ्यासोबत ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी पायरीचीवाडी येथील विद्यार्थ्याची प्रभातफेरी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित ग्रामस्थांना वारंवार हात स्वच्छ धुणे, श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळणे, शिंकताना-खोकताना रुमालाचा वापर करणे, टिश्यू पेपरचा वापर करणे, सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे, वारंवार तोंड, डोळे व नाक यांना हात न लावणे, आजारी व्यक्तीपासून एक मिटर दूर राहणे, गरज असल्यास त्वरित नजीकच्या स्वास्थ केंद्रात भेट देणे इत्यादीबाबत मार्गदर्शन करुन प्रबोधन केले.
कोरोना विषाणूबाबत विद्यार्थ्यांबरोबर ग्रामस्थांमध्ये जागरुकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. यावेळी कोरोनाची लक्षणे, उपाय व काय सावधगिरी पाळली पाहिजे याबाबत जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थी व ग्रामस्थांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले.
-कुणाल पवार, शिक्षक, प्राथमिक शाळा पायरीचीवाडी, ता. सुधागड
माणगावच्या आठवडा बाजारावर संक्रांत
माणगाव : प्रतिनिधी
कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाकडून सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. माणगावात दर सोमवारी भरणार्या आठवडा बाजारावर कोरोनाची कुर्हाड पडली आहे. त्यामुळे या आठवडा बाजारात मिळणार्या विविध वस्तू व भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांना इतरत्र जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून माणगांवातील निजामपूर रोड कालव्यालगत दर सोमवारी आठवडा बाजार भरतो. शहर व तालुक्याच्या विविध भागातील ग्राहकांची या ठिकाणी खरेदीसाठी झुंबड पडते. स्थानिक भाजीपाला, फळे, कलिंगड, काकडी, कारली, शिराळी, घोसाळी, कांदा, लसून, सुकी मासळी यांची या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी, विक्री होते. मात्र कोरोना वायरस पसरु नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माणगांव नगरपंचायतीने हा आठवडा बाजार भरवू नये, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या आठवडा बाजारात येणार्या विक्रेत्यांना सोमवारी दि. 16) आपल्या फळे, भाजीपाला, वस्तू विक्रीसाठी इतरत्र जागा शोधावी लागली. काही विक्रेत्यांनी निजामपूर-पुणे मार्गालगत विविध ठिकाणी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. छोट्या व्यावसायीकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे नागरिकांना आपल्याला हवा असणारा भाजीपाला व वस्तू घेण्यासाठी दुरदूर अंतरावर पायपीट करावी लागली. त्यामुळे सर्वांचीच दमछाक झाली.