नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परदेशातलं मैदान मारुन आलेल्या टीम इंडियाला विश्वचषकाआधीच्या चाचणी परीक्षेत मोठा धक्का बसला आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने टी-20 आणि वन-डे मालिका गमावली आहे. टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवर 2-0 ने बाजी मारली. वन-डे मालिकेत भारताने पहिले 2 सामने जिंकत धडाक्यात सुरुवात केली, मात्र कांगारुंनी अखेरच्या 3 सामन्यात बाजी मारत भारताला पराभवाचा धक्का दिला. विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका होती. यानंतर सर्व खेळाडू 23 मार्चपासून आयपीएलमध्ये सहभागी होतील. या मालिका पराभवानंतर विराटने आपल्या सहकार्यांना, आयपीएलची मजा घ्या असा सल्ला दिला आहे.
ड्रेसिंग रुममध्ये आमची हीच चर्चा झाली की पुढचे दोन महिने सर्वांनी आयपीएलचा आनंद घ्यावा. क्रिकेटमध्ये एखादा मोठा हंगाम खेळत असताना, त्याचा तुमच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 2018 पासून आतापर्यंत आम्ही सतत क्रिकेट खेळत आहोत, त्यामुळे थोडासा थकवा हा जाणवणारच. मात्र आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ज्या पद्धतीने संघ खेळला आहे त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता आयपीएलमध्ये खेळाचा आनंद घ्यायला हवा. अखेरचा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने आपलं मत मांडलं.
30 मे पासून सुरु होणारा विश्वचषक आणि आयपीएलमध्ये अतिक्रिकेटचा तणाव या मुद्द्यावर आमची चर्चा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला विश्रांतीची गरज असल्यास त्यांनी आपापल्या संघमालकांशी चर्चा करावी अशा सुचना प्रत्येकाला देण्यात आलेल्या आहेत. विश्वचषक हा दर चार वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला यासाठी भारतीय संघाचा हिस्सा असावं हे वाटणारचं, कोहली पत्रकारांशी बोलत होता. 23 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार असून गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.