Breaking News

कर्जत, नेरळमध्ये पोलीस आक्रमक

कर्जत : बातमीदार

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला जनता कर्फ्यू पहाटे संपल्यानंतर रात्री 12पासून महाराष्ट्र सरकारने जमावबंदीचा कलम 144 लागू केला आहे. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असताना देखील कर्जत तालुक्यातील सर्व बाजारपेठा गिर्‍हाईकांनी फुलल्या होत्या. शेवटी कर्जत आणि नेरळची बाजारपेठ पोलीस दल आक्रमक झाल्याने बंद पाडण्यात आली आहे. दरम्यान, माथेरानमध्ये पर्यटकांना बंदी असताना तीन पर्यटक माथेरानच्या रस्त्यावर फिरत असल्याने दस्तुरी नाका येथून ते आत गेले कसे? असा प्रश्न उपस्थित होत असून कलम 144 ची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी आता सामान्य जनता करू लागली आहे. कर्जत तालुक्यात जनता कर्फ्यू असताना रात्री बाहेर फिरणार्‍या अनेकांना कर्जत आणि नेरळ पोलिसांनी दंडुक्यांचा प्रसाद दिला होता. मात्र त्यामुळे सोमवारी (दि. 23) कोणीही पुढे येणार नाही याची अपेक्षा पोलिसांना होती. परंतु राज्यात मध्यरात्री 12 वाजल्यापासून जमावबंदी आदेश लागू असून देखील कलम 144 मोडून असंख्य लोक कर्जत आणि नेरळ येथील बाजारपेठा मध्ये एकत्र आल्याने गर्दीने ओसंडून वाहत होत्या. शासनाने कलम 144 मध्ये जमावबंदी आदेश लागू करताना मेडिकल स्टोर, भाजीपाला, दूध आणि किराणा दुकान यांना सूट दिली होती. पण सर्व बाजारपेठ उघडली गेल्याचे चित्र सकाळी अकरा वाजेपर्यंत होते. त्यामुळे रविवारी सकाळी 7 पासून स्वतःहून लावून घेतलेला जनता कर्फ्यू हा आज कशासाठी केला होता? हे गर्दी पाहून समजून येत नव्हते. कर्जत आणि नेरळमधील व्यापारी फेडरेशन यांच्याकडून आवाहन करण्यात आले होते, मात्र तरीदेखील दोन्ही ठिकाणी बाजारपेठ खुल्या होऊन गर्दीने लोक बाजारात फिरत होते. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर प्रशासनाने कलम 144ची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. कर्जत शहरातील बाजारपेठ बंद करण्यात यावी यासाठी कर्जत पोलीस ठाण्याकडून तब्बल चारवेळा सूचना देण्यात आल्या. मात्र भाजीपाला आणि किराणा दुकानात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांना आक्रमक भूमिका घ्यावी लागली आणि दुकाने बंद करावी लागली. दुपारी एक वाजता कर्जत शहरात पुन्हा एकदा जमावबंदी असल्यासारखे बंद पाळण्यात येत आहे. कर्जत आणि नेरळबरोबर डिकसळ, कशेळे, कडाव आणि कळंब येथे असलेल्या लहान बाजारपेठ या सकाळी उघडण्यात आल्या होत्या, मात्र पोलिसांनी 144 कलमबाबत माहिती दिल्यानंतर दुकाने बंद करण्यात आली आहेत. हे सर्व सुरू असताना माथेरान या पर्यटनस्थळी तीन पर्यटक पाठीवर बॅगा टाळून फिरत असल्याचे दिसून आल्याने सर्वत्र खळबळ माजली. माथेरान शहरात तीन पर्यटक दिसून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाच्या वतीने दुपारी त्या तिघांना शोधण्यात आले असून त्यांना शहराबाहेर काढण्यात आले आहे. मात्र जमावबंदी असताना, शहर पर्यटकांसाठी बंद असताना आणि शहराच्या एकमेव प्रवेशद्वारावर खडा पहारा असताना देखील ते कसे शहरात पोहचले, याचा शोध नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply