कर्जत : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने लॉकडाऊन केला असून, संचारबंदी लागू आहे, मात्र त्याचे उल्लंघन करून मद्याची विक्री करणार्या कर्जतमधील आशीर्वाद परमिट रूमवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेथे धाड टाकून 24 हजार 508 रुपयांचा ऐवज जप्त, तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशीर्वाद परमिट रूमच्या मागील बाजूस संचारबंदीचे उल्लंघन करून देशी-विदेशी मद्याची विक्री केली जात असल्याचे आढळले. त्यामुळे कर्जत पोलिसांनी धाड टाकून माल हस्तगत केला तसेच बारमालक मनोज तुकाराम सुर्वे, बारचालक जयंत अनम जैन, मनोज भीम दास, विपुल विलास कचरे आणि निहार रंजनबाबूला महंती अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी भा. दं. वि. कलम 188, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 65 (ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार हर्षद जमदाडे अधिक तपास करीत आहेत. लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात दारूविक्रीच्या घटना उघड होत असून पोलीस धडक कारवाई करीत आहेत.