उरण : वार्ताहर
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, संचारबंदीही लागू केली आहे. अशा परिस्थितीत ज्यांची उपासमार होत आहे व ज्यांना राहायला घर नाही अशांना उरण नगर परिषदेच्या वतीने जेवण व निवार्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या निर्देशानुसार उरण पालिकेने ही कार्यवाही केली आहे.
उरण नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1 व 2 या ठिकाणी गरीब, गरजूंना राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, पिण्याचे पाणी, तसेच चटई, चादर आदी व्यवस्था केली गेली आहे, असे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सांगितले. याकामी उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शिक्षण सभापती रवी भोईर, आरोग्य सभापती रजनी कोळी, नगरसेवक कौशिक शहा व अन्य नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी आदींचे सहकार्य मिळत आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर उरण शहरातील रस्ते व परिसर निर्जंतुक करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत आनंदनगर, राजपाल नाका, कोर्टनाका, मोहल्ला आदी ठिकाणी काम झाले आहे. पुढेही सर्व रस्ते निर्जंतुक केले जातील, अशी माहिती आरोग्य निरीक्षक महेश लवटे यांनी दिली.