Breaking News

रायगडातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले

अलिबाग : प्रतिनिधी

कोविड-19मुळे संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनावरही परिणाम झाला होता. पर्यटक नसल्याने  रायगडातील समुद्रकिनारे निर्मनुष्य झाले होते. शासनाने टाळेबंदी शिथील केली, प्रवासावरील बंधने उठवली. त्यामुळे लोक पर्यटनासाठी बाहेर पडू लागले असून, जिल्ह्यातील किनारे गजबजू लागले आहेत. रायगडातील समुद्रकिनारे, नारळी-पोफळींच्या बागा, हिरवी वनराई, गड-किल्ले, लेण्या पाहण्यासाठी पर्यटक आले आहेत. इतर पर्यटनस्थळे असली तरी जिल्ह्यातील स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमी भुरळ घालत असतात. त्यामुळे पर्यटकांचा ओढा हा किनार्‍यांकडे जास्त असतो. सुट्टीच्या काळात हे किनारे नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असायचे, मात्र कोविड-19मुळे संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आल्याने प्रवासावर बंधने आली. त्याचा परिणाम जिल्ह्यातील पर्यटनावरही झाला, परंतु शासानाने आता प्रवास करण्यास परवानगी दिल्याने एसटी, जलवाहतूक सुरू झाली. हॉटेल्सही खुली झाली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पर्यटक येऊ लागलेत. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांपासून जवळ असल्यामुळे पर्यटक एक किवा दोन दिवासांच्या पर्यटनासाठी रायगडला पसंती देतात.

पर्यटन व्यवसायाला उभारी

मांडवा, आवास, किहिम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, काशिद, मुरूड, दिवेआगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर हे समुद्रकिनारे पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे आहेत. सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक या किनार्‍यांवर आले आहेत. आठ महिने पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद होता, परंतु पर्यटक येऊ लागल्याने समुद्रकिनार्‍यांच्या परिसरातील हॉटेल व्यावसायिक, कॉटेजेस व्यवसायाला उभारी मिळाली आहे. आठवड्यात शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग तीन सुट्या आल्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महानगरांमधील पर्यटक बाहेर पडले आहेत.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply