निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडात कारवाई
अलिबाग : जिमाका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठिकठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे भरारी पथकांनी गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केल्याची माहिती विभागाच्या रायगड जिल्हा अधीक्षक सीमा झावरे यांनी दिली. जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यांत 284 गुन्हे दाखल करण्यात आले; तर गावठी दारू निर्मितीतील 125 जणांना अटक करण्यात आली आहे. आठ वाहनेही जप्त करण्यात आली असून, सर्व मुद्देमाल 43 लाख 87 हजार रुपयांचा आहे.
याचबरोबर परमिट रूमशी संबंध नसलेल्या ढाब्यांवर दंडात्मक कारवाई सुरूच आहे. रात्रभर चालणारे ढाबे, तिथे विकली जाणारी बेकायदेशीर दारू, ऑर्केस्ट्रा बार, लेडीज बार यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.