खोपोली ः प्रतिनिधी
खोपोलीतील खालची खोपोली अमरधामजवळील विजेच्या ट्रान्सफार्मरला सोमवारी (दि. 6) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. परिसरात सुके गवत व अन्य साहित्य असल्याने ही आग पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व खोपोली अग्निशमन दलाने मेहनत घेतली. दरम्यान, यामुळे संपूर्ण खोपोली शहरातील वीजपुरवठा एक तासासाठी खंडित झाला होता.
वीज वितरण अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोकाट माकडाचा धक्का लागून विजेच्या तारा एकमेकांना चिकटल्या व यातून ट्रान्सफार्मरला आग लागली. यात वीजपुरवठा करणार्या तारा जळाल्या व परिसरातील सुके गवत व अन्य साहित्याने पेट घेतला. खोपोली अग्निशमन दल व वीज वितरण कर्मचारी-अधिकार्यांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर जळालेला ट्रान्सफार्मर वीजपुरवठा प्रणालीतून वेगळा करून खोपोली शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.