कर्जत ः प्रतिनिधी
जगभरात कोरोनाचे संकट पसरल्याने कर्जतमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी श्री महावीर जयंती यंदा सोमवारी (दि. 6) जैन बांधवांनी केवळ महावीरांचे दर्शन घेऊन अत्यंत साधेपणाने साजरी केली. इतिहासात पहिल्यांदाच येथील मिरवणूक रद्द करण्यात आली.
श्री महावीर जयंती म्हणजे जैन धर्मियांचा एकप्रकारे सणच आहे. सकाळपासूनच जैन मंदिरात गर्दी असे. विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर चांदीच्या रथातून पंचधातूच्या श्री महावीरांच्या मूर्तीची कर्जत शहरातून मिरवणूक निघत असे. यामध्ये कर्जत शहरातील सर्व जैन बांधव व भगिनी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित असत, मात्र यंदा जगभर कोरोनाचे संकट असल्याने इतिहासात प्रथमच ही मिरवणूक रद्द करण्यात आली. सभागृहात प्राणप्रतिष्ठित केलेल्या पंचधातूच्या मूर्तीचे सोशल डिस्टन्स राखून दर्शन घेण्यात आले.
– मी लहानपणापासून श्री महावीर जयंतीला मिरवणुकीत सहभागी असतो, मात्र यंदा जगावर कोरोना महामारीचे संकट आल्याने हा सोहळा मी पाहू शकलो नाही. मिरवणुकीत चांदीच्या रथाची चाके पहिल्यांदाच थांबली असल्याचे आज पाहिले. -रणजित जैन, माजी अध्यक्ष, कर्जत जैन श्वेतांबर संघ