जनतेने निव्वळ मनोभावे दिवेच प्रज्वलित केले नाहीत, तर दुसर्या दिवशी म्हणजे सोमवारी समाजमाध्यमांवर या उपक्रमाद्वारे आपल्याला कशी विलक्षण जादूई अनुभूती मिळाली याचे वर्णनही केले. आपल्या अनोख्या उपक्रमांतून मोदी जनतेची आंतरिक शक्ती कशी वाढवत आहेत याचेच दर्शन समाजमाध्यमांवरील या प्रतिक्रियांमधून घडते.
जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. भारतातली परिस्थिती युरोप-अमेरिकेच्या तुलनेत आटोक्यात असली तरी कोरोनाबाधितांचे आकडे दिवसागणिक वाढतच आहेत. देशाच्या कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीरपणे करीत आहेत आणि देशभरातील जनताही संपूर्ण विश्वासानिशी त्यांच्या पाठीशी उभी आहे. रविवारी जनतेच्या याच संपूर्ण विश्वासाचे दर्शन देशभरातील दीपप्रज्वलनातून घडले. शुक्रवारी एका व्हिडीओ संदेशाद्वारे मोदीजींनी देशवासीयांशी संवाद साधला होता. 5 तारखेला रात्री 9 वाजता मला तुमची नऊ मिनिटे हवी आहेत, अशी भावनिक साद घालून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत कुणीही एकटे नाही, तर अवघा देश एकत्र लढत आहे याचे दर्शन घडवण्यासाठी घरोघरी दीप वा मेणबत्त्या पेटवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. मोदींच्या शब्दाशब्दावर जीव ओवाळून टाकणार्या जनतेने अर्थातच त्यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद दिला. नऊ मिनिटांसाठी देशाच्या कानाकोपर्यात विजेचे दिवे मालवले गेले आणि अवघा परिसर मिणमिणत्या दिव्यांनी, मेणबत्त्यांनी वा मोबाइलच्या फ्लॅशनी उजळून निघाला. मोदींच्या या उपक्रमावर टीका करणार्या विरोधकांचा जनतेने भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळे चांगलाच मुखभंग झाला. कोरोनाविरोधातली लढाई सोपी निश्चितच नाही. ही लढाई
दीर्घकाळ चालणार आहे. तरीही कुणीही थकायचे नाही वा पराभूत व्हायचे नाही. या लढाईत आपण विजयी होणारच, असा विश्वास बाळगूनच सार्यांनी लढायचे आहे, असे आवाहन सोमवारी मोदीजींनी भारतीय जनता पक्षाच्या 40व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने एका व्हिडीओ संदेशाद्वारे कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादात केले. एकीकडे लॉकडाऊन संपण्याच्या 15 तारखेकडे लोक डोळे लावून बसलेले असतानाच लॉकडाऊन सुरूच राहण्याच्या शक्यतेविषयीची चर्चाही सुरू झाली आहे. 15 तारखेला लॉकडाऊन 100 टक्के शिथिल होईल असे कुणीही गृहित धरू नये, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही सोमवारी केले. लॉकडाऊन कशा तर्हेने मागे घेतले जावे यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचे काही दंडक आहेत. याविषयी केंद्र सरकारकडून ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, त्यानुसार राज्यात कार्यवाही केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. ही सारी विधाने आणि कोरोनासंदर्भातली बदलती आकडेवारी लॉकडाऊन लांबण्याचीच शक्यता अधोरेखित करतात. महाराष्ट्रात सोमवारी 120 नव्या कोरोना रुग्णांची नोंद होऊन कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 868 झाली. उलवे येथे चार नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून पनवेलमधील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे 20 वर गेली आहे. दरम्यान, देशभरातून जमा होणार्या कोरोनासंबंधी आकडेवारीचे विश्लेषण सुरू असून वृद्धांसोबतच 40 वर्षांखालील लोकांनाही कोरोनाचा तितकाच धोका संभवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनामुळे दगावलेल्यांमध्ये मात्र वृद्धांचीच संख्या सर्वाधिक 63 टक्के इतकी आहे. आकडेवारीचे हे विश्लेषण सुरूच राहील व त्यानुसार लॉकडाऊन शिथिल करण्यासंबंधीचे निर्णय सुयोग्य वेळी घेतले जातील, असेही सरकारी अधिकार्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाविरुद्धच्या भारताच्या लढाईचे नेतृत्व मोदीजींच्या समर्थ हातांमध्ये आहे. दीपस्तंभासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला या संकटातून निश्चितपणे तारून नेईल.