Breaking News

उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची सोशल मीडियातून बदनामी

व्हॉट्सअ‍ॅपवर फेक मेसेज

उरण : वार्ताहर
उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांची सोशल मीडियातून बदनामी करण्यात आली आहे. याबाबतचा फेक मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असून, नगराध्यक्ष म्हात्रे यांनी त्याचे स्पष्ट शब्दांत खंडन करून या बदनामीविरोधात उरण पोलिसांत तक्रार दिली आहे.
या फेक मेसेजमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊन असताना उरण कुंभारवाडा (बटाट्याची चाळ) येथे राहणार्‍या कामिनी जाधव मागील 25 दिवसांपासून मुलुंड (मुंबई) येथे त्यांच्या वडिलांच्या घरी राहत होत्या. त्यांना उरण येथे जाण्याची परवानगी मुंबई पोलीस आयुक्त व बीएमसी अधिकार्‍यांनी नाकारली होती. अशा परिस्थितीत उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी पदाचा गैरवापर करून स्वत:ची गाडी मुंबईला पाठवून जाधव यांना उरणमध्ये आणले, तसेच वैद्यकीय तपासणी न करता सासरच्या घरी सोडले. यानंतर जाधव यांच्या घरातील व शेजारीपाजारी घाबरले आहेत, परंतु नगराध्यक्ष म्हात्रे यांच्या दमदाटीमुळे तेथील लोक जीव मुठीत घेऊन गप्प बसलेत. वास्तविक ही सर्व कहाणी कपोलकल्पित असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
मी माझी गाडी कामिनी जाधव नावाच्या कुण्या व्यक्तीला मुंबईहून आणण्यासाठी पाठविली नव्हती. त्यामुळे या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. उरण नगर परिषदेत भाजपची सत्ता व मी नगराध्यक्ष असल्याने आमची बदनामी करण्याचे हे षड्यंत्र असल्याचे नगराध्यक्ष म्हात्रे यांनी दै. रामप्रहरशी बोलताना सांगितले. बदनामी करणार्‍याने ते सिद्ध करावे, असे आव्हानच म्हात्रे यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावून दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply