कर्जत ः प्रतिनिधी
कर्जत शहरात साथरोगाचा प्रसार होऊ नये यासाठी कर्जत नगर परिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 8) विठ्ठलनगर परिसरात कोविड-19 विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता स्वच्छतेच्या दृष्टीने काही पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या वतीने 3 एप्रिलपासून वेगवेगळ्या प्रभागांत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सदरची स्वच्छता तेथील स्थानिक नगरसेवकांच्या देखरेखीखाली करण्यात येईल, असे नगराध्यक्ष सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले. आपल्या प्रभागात लक्षपूर्वक स्वच्छता करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. त्या अनुषंगाने विठ्ठलनगर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्थनिक नगरसेवक बळवंत घुमरे, नगरसेविका संचिता पाटील यांच्या देखरेखीखाली या परिसरातील मातीने भरलेली गटारे साफ करण्यात आली. त्यावरील झाडेझुडपे काढण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक संतोष पाटील, सुनील गोगटे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे यांच्यासह परिसरातील अरुण निघोजकर, श्रेया वैद्य, ज्योती कडू, कुंदा निघोजकर, शेखर देशमुख, बाळासाहेब अहिरराव यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.