Sunday , October 1 2023
Breaking News

कांदा, बटाटा व्यापार्यांचा रस्त्यावरच धंदा सुरु

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा – बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापार्‍यांसाठी विस्तारित मार्केटची उभारणी केली आहे. मूळ मार्केटमधून विस्तारित मार्केटमध्ये जाण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून डांबरी रोड तयार केला आहे. काही महिन्यांपासून या रोडवर कांदा व बटाट्याची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी अतिक्रमण केले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला शेकडो गोणी उतरवून अनधिकृतपणे व्यापार केला जात आहे. त्यांच्या बाजूला इतर फेरीवाल्यांनीही जागा अडविली असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे. बाजार समितीने कांदा व्यापारासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे, परंतु भाजी

मार्केटच्या बाहेर सुरू असलेल्या व्यापारामुळे तेथील व्यापारावर परिणाम होऊ लागला आहे. रोडवर सुरू असलेला हा व्यापार थांबविण्यात यावा व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांनी व बाजार समितीमधील अधिकृत व्यापार्‍यांनी केली होती. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघानेही एपीएमसी पोलीस स्टेशन, बाजार समिती प्रशासनासह महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग अधिकार्‍यांना याविषयी वारंवार पत्र दिले आहे, पण अद्याप संबंधितांवर ठोस कारवाई झाली नाही.बाजार समिती परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही वाढू लागली आहे. पदपथ व रोडवर जिथे जागा मिळेल तेथे अतिक्रमण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. विस्तारित मार्केटच्या परिसरामध्ये फेरीवाले येऊ नयेत यासाठी गेट बांधावे, अशी मागणीही केली आहे.

भाजी मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये रोडवर कांदा-बटाट्याचा व्यापार सुरू आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी. येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी रोडवर गेट तयार करावे व बाजार समितीने तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.

-शंकर पिंगळे, व्यापारी प्रतिनिधी, भाजी मार्केट

Check Also

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी …

Leave a Reply