पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या आदिवासी बांधवांना शुक्रवारी (दि. 10) रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनचा परिणाम डोंगरदर्यांत राहून लाकूड फाटा विकून मोलमजुरी करणार्या आदिवासी समाजावर होत असल्याची परिस्तिथी पाहिल्यानंतर या समाजावर भूक बळीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व पत्रकार लक्ष्मण ठाकूर यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या समाजाला जीवनावश्यक वस्तू दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला तात्काळ विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस प्रशासन ते दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले आणि अवघ्या पाच दिवसांत सात टन धान्य व जीवनावश्यक वस्तू 19 आदिवासी वाड्यांतील 774 कुटुंबांपर्यंत पोहोचले. या अभियानात पनवेल येथील रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिडेंट डॉ. प्रकाश पाटील, कल्पेश परमार व इतर सहकार्यांनी आपले योगदान देत पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत हद्दीतील वडमाल वाडी आणि खैरासवाडी येथील आदिवासी वाडीत युसूफ मेहेरली सेंटरच्या माध्यमातून धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे एकशे वीस किट वाटप केले. त्यामुळे आत्तापर्यंत साडेआठ टन धान्य व जीवनावश्यक वस्तू आदिवासी परिवारापर्यंत पोहोचले आहे. पत्रकार लक्ष्मण ठाकूर यूसुफ मेहेर अली सेंटरचे कार्यकर्ते अनिल विश्वकर्मा, रईस दिवाण, तेजस चव्हाण, मालती म्हात्रे, सावंत यांनी ह्या जीवनावश्यक वस्तूंचे किट आदिवासी बांधवापर्यंत पोहोचविले.