Breaking News

जासई हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती, नूतनीकृत कार्यालयाचे उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शाळेच्या नवीन इमारतीसाठी 50 लाखांची मदत जाहीर

उरण : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136वी जयंती आणि नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 30) झाले. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतात जासई शाखेबद्दल गौरवोद्गार काढले आणि या विद्यालयाची जुनी, मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारणीसाठी 50 लाख रुपयांची भरघोस मदत जाहीर केली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयत’चे सहसचिव बी. एन पवार उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते सुरेश पाटील यांनी स्व. दि. बा. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण तसेच अन्य मान्यवरांनी पूजन केले. पाहुण्यांचे स्वागत रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी केले आणि आपल्या प्रास्ताविकात विद्यालयाने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.
या वेळी विद्यालयातील गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विद्यालयातील गुणवंत शिक्षक प्रा. अतुल पाटील व एस. सी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास ‘रयत’चे रायगड विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर, दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक किशोर पाटील, गव्हाण विद्यालयाचे प्राचार्य गोडगे, लाईफ मेंबर रवींद्र भोईर, विद्यालयाचे चेअरमन अरुण जगे, नरेश घरत, प्रभाकर मुंबईकर, यशवंत घरत, रघुनाथ ठाकूर, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख, प्रा. अतुल पाटील, प्रा. तोरणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका एस. एस. पाटील यांनी केले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply