Breaking News

कोरोनाच्या लढ्यात आघाडीतील घटक पक्षांना आधी सहभागी करा!; चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटीलांना टोला

मुंबई : प्रतिनिधी

‘जयंतराव, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्याची गरज सगळ्यात जास्त आहे,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे.

मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतल्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टीका केली होती. त्याला प्रत्त्युत्तर देताना पाटील म्हणाले की, भाजपचे कार्यकर्ते राज्यभर जीव तोडून मदतकार्य करीत आहेत. कार्यकर्त्यांकडून 560 कम्युनिटी किचन्स चालवली जात आहेत. 43 लाख कुटुंबाना जेवण किंवा शिधा पुरवला जात आहे. 6.50 लाखांपेक्षा जास्त मास्क आणि 4.75 लाख सॅनिटायझरचे वाटले केले. पाच हजार युनिट्स रक्त गोळा केले आहे. कोरोनाविरुद्धची लढाई भाजप गांभिर्याने लढत आहे. या लढाईत राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा शिवसेना कुठे आहे? याची माहिती जयंतरावांनी द्यावी.

  • ‘त्याबाबत’ सहकार्‍यांना मार्गदर्शन करा

जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांकडे अजून दोन महिने आहेत. हाच ठराव मंत्रिमंडळाने मे जूनमध्ये केला असता तरी चालणार होते. कोरोनाविरुद्धची लढाई लढायचे सोडून हा ठराव करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक का बोलवावी लागली? आपण आमदार नाही म्हणून मुख्यमंत्री बेचैन आहेत का? आणि ज्या दोन रिक्त जागांचा उल्लेख आपण करीत आहात त्यांनी पूर्वीच राजीनामे दिलेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला म्हणून राजीनामे दिलेत, मुख्यमंत्र्यांना जागा रिकामी करून देण्यासाठी दिलेले नाहीत. राजकारण करणे, विरोधकांना आपल्या बंगल्यांवर अपहरण करून आणून मारहाण करणे, आर्थिक गुन्ह्यात अडकलेल्यांच्या मौजमजेची व्यवस्था करणे, स्वीय सहायकाला अडवले म्हणून पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करणे, अधिकार्‍यांना वेठीला धरून विश्रामगृहांवर पार्ट्या करणे याखेरीज करण्यासारखी असंख्य कामे आहेत. त्याबाबत जयंतरावांनी सहकार्‍यांना मार्गदर्शन करावे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply