300 कामगारांना दररोज जेवण
पनवेल : बातमीदार – तळोजा भागातील 300 मजुरांना मागील 19 दिवसांपासून अखंडितपणे जेवण देण्याचे काम तळोजा गावातील काही ग्रामस्थ स्वखर्चाने करीत आहेत. या भागात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांतील कामगार, आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना तळोजा गावातील ग्रामस्थांचा आधार मिळाला आहे.
तळोजा सेक्टर 34 परिसरात सिडकोच्या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. शेकडो कामगार येथे काम करतात. याशिवाय या भागातील आदिवासी पाड्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊननंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे संवेदनशील ग्रामस्थ नौफिल सय्यद यांनी स्वखर्चाने जेवण देण्यास सुरुवात केली. गावातील त्यांच्या वाड्यासमोरील जागेत सकाळपासूनच जेवणाची तयारी सुरू होते. दररोज 300 जणांचे जेवण तयार करून स्वतःच्या गाडीमधून वाटप केले जाते. ही सेवा 28 मार्चपासून अखंडितपणे स्वखर्चाने सुरू आहे. विशेष म्हणजे यामध्ये आठवड्यातून दोन वेळा चिकन बिर्याणी देखील दिली जाते.
तळोजा सेक्टर 34, तळोजा फेज 1, फेज 2 मधील कामगार, मजूर दुपारी जेवण येईल आणि आपण जेवू याची वाट पहात असतात. एक दिवसही खंड न पाडता जेवणवाटपाचे काम सुरू आहे. यासाठी त्यांचे बंधू राफील सय्यद, मित्र अम्मार मदार त्यांना मदत करतात. मित्र जुबेर पटेल सकाळी भाजीपाला आणून देण्याचे काम करतात आणि जेवणाचे पाकीट तयार केल्यानंतर दोन गाड्यांमधून जेवणवाटपाचे काम केले जाते. रात्रीच्या वेळी ते 200 जणांचे जेवण तयार करून ते वाटण्याचे काम केले जाते. ही सगळी मदत कोणाकडूनही एक रुपयाचीही मदत न घेता केली जाते.
केवळ आम्ही मजुरांच्या घरातच हे जेवण वाटत नाही तर अनेक चांगल्या घरात देखील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्रस्त लोकांनाही आम्ही जेवण देतो. त्यांचे फोटो काढले तर आम्हाला त्यांना मदत करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. ही मदत लॉकडाऊन संपेपर्यंत अखंडीतपणे सुरूच राहील.
-नौफिल सय्यद, तळोजा पोलीस आयुक्तांकडून कौतुक
सुरुवातीला तळोजा पोलिसांच्या सहकार्याने नौफिल सय्यद यांनी जेवण वाटण्याचे काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी ट्विटर आणि
फेसबुकवर त्यांच्याविषयी लिहून त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.