Breaking News

शैक्षणिक संस्थांना करावा लागणार अडचणींचा सामना

अलिबाग ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या कालावधीत शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत.  त्यामुळे त्यांना शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी इतर प्रशासकीय कामे करताना  अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरोनामुळे देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आली होते. त्यामुळे राज्यातील नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यानंतर लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आले. या काळात सर्व शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात परीक्षा संपतात. त्यानंतर  निकाल लागतो. निकाल लागल्यावर प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर मुख्याध्यापकांना 15 दिवसांची सुटी दिली जाते. ते सुटीवर जाण्याआधी जून महिन्यात शाळा सुरू होण्यापूर्वीची आवश्यक असलेली पूर्वतयारी करून ठेवलेली असते. आता लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आले आहे. या कालावधीत शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात मुख्याध्यापकांना सुटी असते. सुटी असल्याने मुख्याध्यापक कामावर आले नाही तर अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे या लॉकडाऊनमध्ये शैक्षणिक संस्थांमधील मुख्याध्यापक व काही शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शाळेत उपस्थित राहून काम करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

वाशी येथे रयत टेलिकाऊन्सिलिंग

नवी मुंबई : बातमीदार

वाशी येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाअंतर्गत रयत टेलिकॉऊन्सिलिंग उपक्रम मंगळवारपासून सुरु करण्यात आला आहे. कोविड 19 च्या साथीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना घरात राहून आलेल्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, अशावेळी मानसिक आरोग्य व मनोबल संतुलित ठेवणे खूप आवश्यक आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. शिवणकर व मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. इजाज शेख यांच्या प्रयत्नाने रयत टेलिकाऊन्सिलिंग सेवा सर्वांसाठी मोफत सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रिन्सिपल  डॉ. व्ही. एस. शिवणकर यांनी केले आहे.

उरणमध्ये दुकानांसाठी वेळापत्रक

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरण तहसील कार्यालय, उरण पोलीस ठाणे व उरण नगरपरिषद यांच्या वतीने मंगळवारपासून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे वेळापत्रक काढण्यात आले आहेत. सर्व दुध विक्रीची दुकाने यांनी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत सुरु राहतील, किराणा दुकाने सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. बुधवार, शुक्रवार आणि रविवार पूर्णवेळ बंद ठेवावी. सर्व भाजी विक्रेते, मासे विक्रेते, चिकन विक्रेते आणि मटण  विक्रेते यांनी पुढील आदेश येईपर्यंत आपली दुकाने बंद ठेवावी. अशाप्रकारचा आदेश उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी सर्व विक्रेत्यांना दिला असून या आदेशाचे पालन करुन ग्राहकांनीही याला सहकार्य करावे, असे सांगितले आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply