शहर पोलिसांनी घेतले ताब्यात; गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार, वार्ताहर, प्रतिनिधी
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्यावश्यक कामे नसताना देखील नागरिक फिरु लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांमार्फत ड्रोन कॅमेर्याद्वारे निगराणी सुरू करण्यात आलेली आहे. कोळीवाडा येथील काही व्यक्ती खाडी किनार्यावर जमत असल्याचे आढळून आल्याने शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात साथ रोग अधिनियम कलम 3,4 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 11 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पनवेल शहरात दोन ड्रोन कॅमेर्याद्वारे सर्वत्र पाहणी करण्यात येत आहे. प्रामुख्याने तक्का परिसर त्याचप्रमाणे खाडी किनारा व ज्या ठिकाणी पोलीस सहजासहजी पोहचू शकत नाही अशा गल्ल्या, तसेच संध्याकाळच्या वेळेस गच्चीवर जमणारे नागरिक यांच्यावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. नियम तोडणार्यांविरुद्ध कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 22 एप्रिलला सायंकाळी काही व्यक्ती खाडी किनार्यावर जमत असल्याचे आढळून आल्याने तेथे जावून पोलिसांनी सर्वांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र याला न जुमानता काही व्यक्ती खाडी किनार्यावर असल्याचे दिसल्याने शहर पोलिसांनी 10 व्यक्तींना ताब्यात घेतले. तसेच जे लोक बिल्डींगच्या टेरेसवर आढळून येतील त्या सोसायटीच्या कमिटी सदस्यांना नोटीसा देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांना आवाहन आहे की, त्यांना सर्व नियमांचे पालन करावे, घरात रहावे सुरक्षित रहावे व कोरोनाला पळवून लावावे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी म्हटले आहे.
‘नियमांचे पालन करा, घरीच सुरक्षित राहा’
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तरी या दिवसामध्ये शासनाने दिलेल्या नियमाचे पनवेलकरांनी पालन करावे, आपल्या कुटुंबासह घरीच राहा, सुरक्षित राहा, अत्यावश्यक असेल तेव्हाच घरा बाहेर पडा, आता ड्रोन कॅमेर्यामार्फत पनवेलची पाहणी करण्यात येणार असून जे बिनाकामाचे फिरत असतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये सामाजिक विलगीकरणाचे पालन करा -राजपूत
पनवेल : वार्ताहर
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत आगामी पवित्र रमजान सणाच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी तालुक्यातील वावंजे येथे मौलानांची सोशल डिस्टन्सिंगद्वारे बैठक घेवून त्यांना मार्गदर्शन केले. ही बैठक ही आगामी पवित्र रमजान सणाच्या अनुषंगाने घेण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा (कोविड-19) संसर्ग, संक्रमण टाळण्यासाठी शासनाकडून काही सूचना आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्या प्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना केल्या आहेत. त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत मस्जिदीमध्ये नियमित नजाम पठण, तरावीह तसेच इफ्तारासाठी एकत्र येवू नये, घराच्या व इमारतीच्या छतावर नियमित नमाज पठण किंवा इफ्तार करण्यात येवू नये, मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येवू नये. कोणत्याही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येवून करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्व मुस्लीम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार धार्मिक कार्य पार पाडावे, लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत उपरोक्त सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या बैठकीला वावंजे येथील सुन्नी जामा मशिद, नुर मशिद, सुन्नी इब्राहीमी मशिद, दारुल तोहिद मशिद येथील मौलाना या वेळी उपस्थित होते. तसेच मोहम्मद समशान, सिरोज शेख, मोहमद जसीम खान, अशरफ खान, फैयाज अहमद खान, मैबुल्ला चैधरी, आबेयदुल्ला हमिदुल्ला खान असे मौलवी उपस्थित होते.