उरण : वार्ताहर
कोविड-19 अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने दि. 23 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. या काळात वैद्यकीय तसेच पोलीस कर्मचारी आपल्या प्राणांची पर्वा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. या कर्मचार्यांच्या बरोबरीनेच डाक विभागाचे कर्मचारी सुद्धा या लढाईत सहभागी झाले असून अहोरात्र सेवा देत आहेत. कोविड-19 वैद्यकिय साहित्य व उपकरणांच्या संपूर्ण देशातील तत्पर पुरवठ्यासाठी भारतीय डाक विभाग महत्वाचा दूवा म्हणून समोर आला आहे.
नवी मुंबईमधील औद्योगिक परीसरातील उत्पादन केंद्रांमधून वैयक्तिक संरक्षक किट्स, मास्क, औषधे तसेच विविध वैद्यकीय उपकरणे देशाच्या वेगवेगळ्या भागात पाठविण्यात येत आहेत. नवी मुंबई डाक विभागाद्वारे ही सामग्री बुक करण्यात येत असून त्वरीत वितरणासाठी पुढे पाठविण्यात येत आहे. लॉकडानच्या काळात जवळपास 1298 किलोग्राम वैद्यकिय साहित्य नवी मुंबई विभागातून पाठविण्यात आले आहे. भारतीय डाक विभागाचे जाळे देशात सर्वदूर पोहचलेले आहे, त्याचा फायदा तत्पर सेवा देण्यासाठी होत आहे..
त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून नवी मुंबई डाक विभागातील कर्मचार्यांनी समजातील वंचित घटकांना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी स्वेच्छेने देणगी जमा करून रूपये एक लाख दहा हजारांचा निधी उभारला. या निधीमधून नवी मुंबईमधील वाशी, तुर्भै, पनवेल, टेम्भोडे, वळवली या परीसरातील गरजूंना तसेच स्थलांतरीत कामगारांना आतापर्यंत पाचशे जीवनावश्यक अन्नधान्य पाकीटांचे वाटप नवी मुंबई डाक विभागामार्फत करण्यात आले आहेत. नवी मुंबई डाक विभागाच्या कर्मचार्यांनी वरील क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून गरजूंपर्यंत मदत पोहचवली आहे.
इंडीया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या-एझड सेवेच्या माध्यमातून परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना बँकींग सुविधा नवी मुंबई डाक विभागाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेटंस बँकेच्या माध्यमातून स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या परराज्यातील परिवारास डिजिटली पैसे हस्तांतरीत करण्यास मदत होत आहे.
नवी मुंबई डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक डाक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देत आहे. त्या दरम्यान योग्य ती स्वच्छता व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन डाक कर्मचारी करत आहेत.
-डॉ. अभिजित इचके, वरिष्ठ अक्षीक्षक, नवी मुंबई डाक विभाग