रेवदंडा : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील बोर्ली आरोग्य केंद्राची कोरोना संकटकाळात सतर्कतेने सेवा सुरू असून रुग्णसेवेसह, कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्य सेवा यांचे मार्गदर्शन नागरिकांना केले जाते. बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नादगांव उपपथक, व वळके तसेच चेहेर, कोर्लई, काशिद, नांदगाव, वाळवंटी अशा सहा उपकेंद्रांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद नंदगाव व डॉ. राजश्री जगताप हे दोन वैद्यकीय अधिकारी सेवा देत असून आरोग्य सहाय्यक गणेश भोबू, उदय गाडे, हेमलता वाडेकर, औषध निर्माण अधिकारी अनिकेत हजारे हेही कार्यरत आहेत. एकूण 10 आरोग्य सेविका व चार आरोग्य सेवक, 40 आशा कार्यकर्ती, 64 अंगणवाडी सेविका, 15 ग्रामपंचायतींचे कर्मचारी, शिक्षक, महसूल विभाग व पोलीस पाटील हे एकत्रित काम करीत आहेत. बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक रुग्णवाहिका असून, औषधाचा पूर्ण साठा तैनात करण्यात आला आहे. मुरूड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे अंगणवाडी सेविकांमार्फत गावागावांतील घराघरांत तपासणी करून प्रत्येक व्यक्तीबद्दल नोंदी ठेवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे येथून मूळ गावी परतलेल्या चाकरमान्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. उपकेंद्रातील सर्व कर्मचारीही प्रत्येक गावात जाऊन कोरोनाविषयक सर्वेक्षण करून या संसर्गजन्य रोगाविषयी लोकांना माहिती देतात. शिवाय हात स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे, तोंडावर रूमाल, मास्क बांधणे, घरातून बाहेर पडू नये, घरातच राहणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखणे आदी आरोग्य जनजागृती करीत आहेत. प्रत्येक गावात कोरोना नियत्रंण कक्ष उभारण्यात आला असून, ग्रामपंचायतींमार्फत सर्व गाव व वाड्यांमध्ये कोरोना रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली जात आहे.