उरण : प्रतिनिधी
दरवर्षी एप्रिल-मे महिना आला की शहरांपेक्षा ग्रामीण परिसरातील महिला व नागरिक मिरची आणि मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी गर्दी करीत असतात. मात्र यंदा जगभरात कोरोनाचे सावट कोसळल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. मात्र काही नागरिकांनी मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी झुंबड केलीआहे. त्यामुळे बाजारपेठेतील व्यापार्यांनी लॉकडाऊनचे कारण पुढे करीत दुप्पट भावाने मिरची आणि मसाल्याचे पदार्थ विक्री चालविली आहे.
सध्या माल येत नसल्याचे कारण ग्राहकांना सांगून, 3 मेच्या लॉकडाऊन नंतरही मिरची व मसाल्याचे भाव कमी होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शहरापर्यंत दुचाकी किंवा अन्य वाहनांच्या साहाय्याने उरण शहर गाठून बाजारपेठेतील मिरची व मसाला पदार्थ खरेदी करण्यासाठी मागील पंधरा दिवसांपासून सकाळी 8 वाजल्यापासून उरण बाजारपेठेतील मिरची दुकान दारांच्या दुकानासमोर अधिक संख्येने काही नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरवर्षी पेक्षा दुप्पट भाव घेत असल्याने गावोगावच्या गिर्हाईकांच्या खिशाला कात्री बसत आहे. मात्र मिरची विक्री करणारे व्यापार्यांची चांदी असल्याचे बोलले जात आहे.
तर या मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी जाणार्या आणि आर्थिक तंगी असलेल्या गरीब व गरजूंना हातात पैसे नसल्याने बाजारातून माघारी यावे लागत असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. त्यामुळे यंदा उरणच्या बाजारपेठेतील मिरची कडाडली असून, गरीब, गरजू आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबियांच्या तोंडचे पाणी पळाले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मिरची खरेदीसाठी गर्दी होत असून, मिरची विक्रेत्यांच्या दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा अभाव दिसत आहे.