मुरूड ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुरूडमधील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयातील डीएलएलइ विभागातील मुलांनी 600 मास्क तयार करून सामाजिक उपक्रम राबवला आहे.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले 600 मास्क लोकांसाठी कर्तव्य बजावणारे मुरूड पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचार्यांना प्रत्येकी 200 अशा एकूण 600 मास्कचे वाटप संस्थेचे सहसचिव अब्दुल रहीम कबले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे मुख्य लिपिक जुहेब मोदी उपस्थित होते.
महाविद्यालयातील मुलांनी सुटीचा सदुपयोग करून शासकीय यंत्रणा अधिक प्रबळ करण्यासाठी आवश्यक अशा मास्कची निर्मिती करून मोलाचे सहकार्य केले आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवून लोकाभिमुख कार्यात मदत करावी, असे मुरूड तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा देणारे लोक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कार्यरत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत मास्क बनविले. ते शासकीय कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.